आटपाडी उपाशी, सांगोला तुपाशी
By admin | Published: October 8, 2015 11:15 PM2015-10-08T23:15:06+5:302015-10-09T00:37:55+5:30
परतीच्या पावसाने बंधारे भरले : ‘माणगंगा’तून पाणी थेट सांगोला तालुक्यास
अविनाश बाड- आटपाडी परिसरात पडलेल्या दमदार पावसामुळे रविवार, दि. ४ रोजी आटपाडी तलाव भरला. सांडव्यातून शुक ओढ्याद्वारे पांढरेवाडीचा आणि काळे खडी येथील वसंत बंधारे भरुन मागील दोन दिवसांपासून पाणी माणगंगा नदीतून थेट सांगोला तालुक्यात जात आहे. तसेच माडगुळे परिसरावर पावसाने अवकृपा केल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकरी उपाशी आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकरी तुपाशी, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
आटपाडी तलावाचे पाणलोट क्षेत्र तालुक्यातील सर्व तलावांपेक्षा चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात आटपाडी तलाव सर्वात आधी भरतो. या तलावात ‘टेंभू’चे पाणीही आधी सोडले होते. त्यात दि. १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे ३०८.९७ द.ल.घ.फूट क्षमता असलेला हा तलाव भरुन रविवारी सायंकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले.
आटपाडीच्या शुक ओढ्यावर माणगंगा नदीला ओढा मिळेपर्यंत पांढरेवाडी आणि काळीखडी येथे दोन वसंत बंधारे आहेत. हे बंधारे दोन दिवसांपासून पाण्याने भरुन पाणी माणगंगा नदीतून थेट पुढे सांगोला तालुक्यात जात आहे.
तसेच माडगुळे परिसराला यंदा पावसाने दगा दिल्याने या गावातील ओढा आणि सिमेंट बंधारे पूर्णपणे कोरडे आहेत. या गावाचा परिसर सखल असल्याने इथे जलसंधारणाची ओढा वगळता कसलीही कामे होऊ शकत नाहीत. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माडगुळेच्या ओढ्यावर साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे ओढाकाठावरील शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे फायद्याचे ठरले आहेत. पण पाऊसच नसल्याने बंधाऱ्याजवळील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. ओढाकाठावर दोन्हीही बाजूला शेतकऱ्यांनी सुमारे २५० एकर डाळिंबाच्या बागा लावल्या आहेत. आता या बागांना डाळिंबे लागली आहेत. विहिरीतील पाणी संपल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यासाठी आटपाडी तलावाच्या कालव्यातून मासाळवाडीच्या ओढ्यातून सध्या सांडव्यातून वाया जाणारे पाणी सोडले, तर माडगुळेचा गावतलाव भरुन घेता येईल. या तलावाखाली गावाची पाणी पुरवठा विहीर आहे. त्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. त्यानंतर गावाच्या पश्चिमेस कुलकर्णी वस्तीवरील सिमेंट बंधारा, गावाजवळील बंधारा, खडकी वस्तीवरील दोन बंधारे आणि बलवडी हद्दीवरील चावरातील वसंत बंधारा पाण्याने भरुन घेण्याची गरज आहे.
एवढे बंधारे भरुन घेतले, तर या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम आणि डाळिंबाच्या बागा यशस्वी होणार आहेत. त्यामुळे सुमारे साडेपाचशेहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मासाळवाडीतील ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
हे व्हायला हवे! : पाच आॅक्टोबरनंतर पावसाची उघडीप
आटपाडी तालुक्यात दि. ५ आॅक्टोबरनंतर पावसाने उघडीप दिली आहे. सध्या तालुक्यात पावसाचे वातावरणही नाही. त्यामुळे आटपाडी तलाव पश्चिम भागातून ओढ्याने येणारे पाणी सध्या सांगोला तालुक्यात वाहून जाणारे पाणी जास्त दिवस जाऊ देण्यापेक्षा सध्या कालव्यातून कमी क्षमतेने पाणी सोडून काही बंधारे भरून घेतले जात आहेत. त्यापेक्षा पूर्ण क्षमतेने पाणी सोडून या पाण्याने तलावापासून माडगुळेच्या बलवडी हद्दीपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल, असे तात्काळ नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.