करगणी : आटपाडी बाजार समितीच्या सौद्यांमध्ये गुरुवारी शेटफळे येथील प्रयोगशील युवा शेतकरी रूपेश गायकवाड यांच्या भगवा वाणाच्या डाळिंबास तब्बल ११५१ रुपयांचा दर मिळाला.
रूपेश गायकवाड यांनी नवीन डाळिंबास दर कितपत मिळेल, हे पाहण्यासाठी गुरुवारी ११९ किलाे डाळिंब आटपाडीतील श्रीमंत बाबासाहेब देशमुख बाजार समितीत सौद्यासाठी आणले होते. यापैकी ९६ किलाे डाळिंबास ११५१ रुपये प्रतिकिलाेप्रमाणे एक लाख ४ हजार ९६ रुपये, तर २३ किलाे डाळिंबास ६०० रुपये प्रतिकिलाेप्रमाणे १३ हजार ८०० रुपये मिळाले.
रूपेश गायकवाड व त्याचे बंधू अमर शेतीत नवनवीन प्रयोग राबवितात. सेंद्रिय शेतीवर त्यांचा भर आहे. त्यांची १४ एकरांवर डाळिंब बाग आहे. येथे त्यांनी पाच हजारांवर भगवा वाणाची लागवड केली आहे. प्रसंगी टँकरने पाणी आणून बाग सांभाळली आहे. अतिवृष्टीत बागेतील पाणी निचरा व्यवस्थित होण्यासाठी काटेकाेर नियोजन केले. आतापर्यंत दहा लाखांवर खर्च केला आहे. सध्या तीन हजार झाडांपासून उत्पन्न सुरू झाले आहे. ७०० ते ८०० ग्रॅमपर्यंत एका डाळिंबाचे वजन आहे. आतापर्यंत त्यांना ८२ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून, आणखी एक काेटीचे उत्पन्न अपेक्षित आहे.
काेट
शेटफळेच्या शेतकऱ्याने बाजार समितीच्या सौद्यात आणलेल्या डाळिंबांना आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळाला आहे. शेतकऱ्यांनी येथे डाळिंब आणल्यास उच्चतम भाव मिळेल.
- भाऊसाहेब गायकवाड, सभापती, श्रीमंत बाबासाहेब देशमुख बाजार समिती, आटपाडी
फोटो : ०७०१२०२१एसएएएन०१ व २ : सौद्यातील पावती आणि डाळिंबे.