सोरडीत तलाठ्यावर वाळू तस्करांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:54+5:302021-03-27T04:27:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : सोरडी (ता. जत) येथील गावकामगार तलाठी व तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शंकर जगताप (वय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : सोरडी (ता. जत) येथील गावकामगार तलाठी व तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शंकर जगताप (वय ५३, रा. विद्यानगर, जत) यांना वाळू तस्करांनी मारहाण केली. सोरडीखालील चाबरेवस्ती येथील वाळूच्या साठ्याचा पंचनामा करण्यासाठी गेले असता शुक्रवारी दुपारी ११ पुरुष आणि महिलांनी काठी, दगडाने हल्ला केला. विळ्याने करंगळीवर वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
जगताप यांनी ११ जणांविरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
जगताप स्वतःच्या चारचाकीतून दुपारी साडेबाराच्या दरम्यान चाबरेवस्ती येथे बेकायदेशीर वाळूच्या साठ्याचा पंचनामा करण्यासाठी एकटेच गेले होते. ते आल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथील नागरिकांनी आरडाओरडा करून सर्वांना एकत्र केले होते. लक्ष्मण पुतळाप्पा चाबरे व त्यांच्या दोन पत्नी आणि दोन मुले, मनगेनी पुतळाप्पा चाबरे, गौराबाई पुतळाप्पा चाबरे, राहुल लक्ष्मण चाबरे, विकास मनगेनी चाबरे, राजू मनगेनी चाबरे, बिरा शंकर चाबरे (सर्व रा. चाबरेवस्ती, सोरडी, ता. जत) यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी जगताप यांच्यावर काठी, दगडाने हल्ला केला. विळ्याने करंगळीवर वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
जत तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने या घटनेचा निषेध करून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ भोसले करत आहेत.