मोदी-फडणवीस सरकारकडून एकतेवर हल्ले
By admin | Published: October 30, 2015 11:45 PM2015-10-30T23:45:05+5:302015-10-30T23:45:57+5:30
जयंत पाटील : भाजप-सेनेच्या भांडणात जनता महागाईच्या दुष्टचक्रात; इस्लामपूरमध्ये मोर्चा
इस्लामपूर : भाजपला सरकारमध्ये शिवसेना नको आहे, तर शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. त्यांच्यामधील भांडणात राज्यातील शेतकरी जनता महागाईच्या दुष्टचक्रात होरपळून निघत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची या शासनाची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे, असा हल्लाबोल आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केला. तसेच केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एकतेवर हल्ले चढवून सामाजिक अस्वस्थता निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वाढती महागाई व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाचा निषेध करण्यासाठी तहसील कचेरीवर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चास मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते. मोर्च्यात इस्लामपूर, आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते, शेतकरी, पदाधिकारी सहभागी झाले होते़ तरूण व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती़ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार रुपाली सरनोबत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आ. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी सामान्य जनतेच्या मनातील असंतोष मोर्चाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडत आहे़ सामान्य माणसांचे प्रश्न मांडत, शासनाच्या चुका वेशीवर टांगण्यात येतील. सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणाऱ्या आपल्या देशात अल्पसंख्याक, दलित, आदिवासी भीतीच्या वातावरणात असून अनेक विचारवंत, साहित्यिक पुरस्कार परत करीत आहेत. कल्याण—डोंबिवली महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डाळींच्या गोदामावर छापे टाकण्याचे नाटक केले आहे़
यावेळी माणिकराव पाटील, दिलीप पाटील, पी़ आऱ पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड़ चिमण डांगे, डॉ़ प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वैभव शिंदे, सुस्मिता जाधव, छाया पाटील, शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, अर्चना कदम यांनी शासनावर हल्लाबोल केला़
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जुन्या कचेरीपासून मोर्चाची सुरुवात झाली़ भर उन्हातच हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरुन तहसील कचेरीवर आला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘दिवाळी दसरा - अच्छे दिन विसरा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
विजयभाऊ पाटील, जनार्दनकाका पाटील, विष्णुपंत शिंदे, प्रा़ शामराव पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, उपसभापती भाग्यश्री शिंदे, विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, सभापती आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, जगन्नाथ पाटील, प्रकाश रूकडे, अनिल पाटील, रोझा किणीकर, कमल पाटील, भगवान पाटील, अॅड़ विश्वास पाटील, बाळासाहेब लाड, विजयबापू पाटील, शंकरराव भोसले, सुनीता देशमाने, मीना मलगुंडे आदी मोर्च्यात सहभागी होते़
शैलेश पाटील यांनी स्वागत केले, नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी यांनी आभार मानले़ (वार्ताहर)
डान्स बारमधील महिलांना अच्छे दिन..!
‘अरे कुठे गेले कुठे गेले, अच्छे दिन कुठे गेले?’ अशी घोषणा मोर्च्यात दिली जात होती़ तोच धागा पकडत आ़ पाटील म्हणाले, अरे बाबा, डान्स बारमधील महिलांना तरी अच्छे दिन आले, तुझी काय तक्रार आहे का? असे ते म्हणताच सभास्थळी एकच हशा पिकला. आम्ही डान्स बार, मटका बंद केला, यांनी तो सुरू केला. आता आपल्याच जिल्ह्यात मटका सुरू झाला आहे़ तो कोण चालविते, हे आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे़
शासनाच्या चुकीमुळेच कांद्याने डोळ्यात पाणी आणले
पेट्रोल व डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होऊनही हे शासन जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करू शकले नाही़ कांद्याने डोळ्यात पाणी आणले असून डाळींचे दर गगनाला भिडले आहेत़ शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमालास १0-२0 टक्के जरी दर वाढवून दिले असते, तरी कांदा, डाळी आयात कराव्या लागल्या नसत्या, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.