सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा

By संतोष भिसे | Published: April 5, 2024 03:56 PM2024-04-05T15:56:16+5:302024-04-05T15:56:35+5:30

सांगली : सांगलीत महार वतनातील ३५ एकरहून अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. ती तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर ...

Attempt to grab 35 acres of Mahar Watan land in Sangli, warning of boycott of Lok Sabha polls | सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा

सांगलीत ३५ एकर महार वतन जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा

सांगली : सांगलीत महार वतनातील ३५ एकरहून अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. ती तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा महार वतन बचाव संघर्ष समिती व हिंदू एकता आंदोलन संघटनेने दिला.

हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, सुरेश दुधगावकर, नितीन गोंधळे, सिद्धार्थ कुदळे, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, शुभम गोंधळे आदींनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, पत्रकारनगर, मुजावर प्लॉट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता,  कत्तलखाना  परिसर, गणेशनगर, गारपीर या टप्प्यात सुमारे ३५ एकर महार वतन जमीन आहे. त्यावर मालकी असणाऱ्या आंबेडकरी समाजाला दमदाटी करुन व फसवून काही लोकांनी हाकलून लावले. जमीन कसण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर हळूहळू अतिक्रमणे केली. काही ठिकाणी पक्की बांधकामे केली आहेत, तर काही ठिकाणी पत्र्याची शेड मारुन जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाला विस्थापित व्हावे लागले आहे. विचारणा करण्यास गेले असता धाक दाखविला जातो. दमबाजी केली जाते. प्रसंगी नशेखोरांना अंगावर सोडले जाते. 

शिंदे यांनी सांगितले की, या परिसरात सध्या अवैध धंदे बोकाळले आहेत. बेकायदा दारुविक्री, गॅसची तस्करी, मटक्याचे अड्डे फोफावले आहेत. गुंडगिरी वाढली आहे. त्यामुळे गरीब मागासवर्गीयांना जगणे मुश्किल झाले आहे. या जमिनी १० रुपयांच्या मुद्रांकाच्या आधारे बळकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मूळ उताऱ्यावर आंबेडकरी समाजाचीच नावे आहेत. तेथील अतिक्रमणे जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिसांनी तातडीने हटवावीत, अन्यथा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू.

यावेळी रोहन गोंधळे, राजेंद्र गोंधळे, प्रथमेश लोखंडे, राजेश कांबळे, आकाश गोंधळे, जगदीश कुदळे आदी उपस्थित होते.

Web Title: Attempt to grab 35 acres of Mahar Watan land in Sangli, warning of boycott of Lok Sabha polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.