सांगली : तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत शिष्यवर्गाचे तबलावादन, उस्ताद रफिक खान यांचे सतार वादन आणि पंडित संदेश पोपटकर व पं. मनमोहन कुंभारे यांच्या तबलावादनाने उपस्थित संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमास सांगलीकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तबलाविभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर स्मृतिदिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात ऱ्हिदम अॅकॅडमीतर्फे संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत संमेलनाच्या निमित्ताने श्रोत्यांना अनोखी मैफल अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालमणी पंडित मनमोहन कुंभारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ताल वाद्य कचेरी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये धनंजय गुरव, सागर सुतार, पोपट जावीर, विजय सांडगे, नंदकुमार खोत, धनाजी केंगार, प्रल्हाद माळी, ओंकार काळे, प्रभाकर पुजारी यांनी तबला, पखवाज, ढोलक, संबळ, ढोलकी आदी पारंपरिक वाद्यांचा एकत्रित आविष्कार सादर केला. झपताल आणि त्रितालातील विविध रचनांना रसिकांची वाहवा मिळाली.हुबळी येथील कृष्णेंद्र वाडीकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी पटदीप रागात विलंबित ख्याल व चीज सादर केली. त्यांना पंडित संदेश पोपटकर यांनी तबलासाथ, तर तुकाराम बुगड यांनी हार्मोनियम साथ दिली. अभंग सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली.उत्तरार्धात बिनकार घराण्याचे उस्ताद रफिक खान यांनी सतारवादन सादर केले. सुरुवातीला त्यांनी किरवाणी रागात आलाप, जोड, झाला सादर केले. विलंबित लयीत आणि द्रुत लयीत गत रुपक या तालात सादर करून रसिकांची मने जिकंली. शेवटी एक धून सादर करून त्यांनी सतारवादन थांबवले. त्यांना पंडित मनमोहन कुंभारे यांची तबलासाथ मिळाली.शेवटच्या सत्रात पंडित संदेश पोपटकर व पंडित मनमोहन कुंभारे यांच्या तबलासहवादनास ताल-त्रितालात सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या तबलावादनात पेशकार, कायदे, रेले, चलनवर आधारित कायदे, गत, चक्रधार, परन आणि इतर बंदिशी घराण्याच्या परंपरेतील नियमानुसार अत्यंत तयारीसह, चमत्कृतीपूर्ण पद्धतीने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना विजय सांगडे यांनी लहरासाथ दिली. धनंजय गुरव यांनी सूत्रसंचालन केले.