लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाने सुरु केलेल्या ऑनलाईन शाळा पालकांसाठी त्रासदायी व न परवडणाऱ्या ठरत आहेत. बालहट्ट परवडेना, पण तो पुरविल्याविना चालेना, अशी स्थिती सध्या सर्वत्र दिसत आहे. महागडे स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब यांच्या आधुनिक दुनियेत वसलेल्या शाळेत सर्वांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे या साधनांच्या खरेदीची अपरिहार्यता पालकांना स्वीकारावी लागत आहे.
सांगली जिल्ह्यात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत शासकीय, खासगी शाळांचे जाळे विणले आहे. शैक्षणिक वाटेवरुन मुलांच्या करिअरची स्वप्ने रंगविणाऱ्या पालकांनी कधी स्वप्नातही महागड्या शिक्षणाचा विचार केला नव्हता. देणगी, शुल्क, शैक्षणिक साहित्य, गणवेेश, करमणुकीचे कार्यक्रम, सहली यांच्या खर्चापर्यंतची माहिती आजवर पालकांना होती. हाच खर्च त्यांची चिंता वाढविणारा असताना त्यात आता ऑनलाईन शिक्षणाची भर पडली.
गणवेश, रिक्षा किंवा वाहनभाडे इतकाच खर्च वाचला आहे. शाळांचे शुल्क, देणग्या हे सर्व सुरुच आहे. शिवाय आता स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब यांचीही खरेदी मुलांसाठी करावी लागत आहे. त्या खरेदीपर्यंत हे गणित थांबत नाही, तर इंटरनेटच्या मासिक पॅकपर्यंत ते चालूच राहते. त्याचाही अतिरिक्त भार पालकांवर पडत आहे.
चौकट
जिल्ह्यातील मोबाईल व संगणक विक्रेते ३५०
महापालिका क्षेत्रातील विक्रेते १५०
चौकट
मागील शैक्षणिक वर्षात १० कोटींची उलाढाल
जून २०२०मध्ये जेव्हा काही काळापुरते अनलॉक झाले होते, त्यावेळी अवघ्या पंधरा दिवसांत मोबाईल, लॅपटॉप व टॅबच्या माध्यमातून जिल्ह्यात १० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. सध्या लॉकडाऊन असले तरी ऑनलाईन खरेदी सुरुच आहे.
चौकट
आवाक्याबाहेरची गोष्ट
शेतमजुरी, एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या, रोजंदारीवर जाणाऱ्या किंवा किरकोळ कामे करुन संसाराचा डोलारा सांभाळणाऱ्या अनेक पालकांना ई-लर्निंगची ही दुनिया न परवडणारी आहे. ही साधने जरी विकत घेतली तरी महिन्याचा इंटरनेटचा खर्च त्यांना झेपणारा नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी नव्या शिक्षणपद्धतीपासून वंचित आहेत.