रेमडेसिविर इंजेक्शनच्या थेट विक्रीवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:34+5:302021-04-13T04:25:34+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या व त्यामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दाखल रुग्णांना वापरण्यात ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या व त्यामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दाखल रुग्णांना वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजाराच्या तक्रारीनंतर आता थेट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. रेमडेसिविरचा पुरवठा होलसेलरकडून केवळ कोविड रुग्णालय व संलग्न असलेल्या औषध दुकानांनाच करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.
कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच, उपचारासाठी दाखल रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. या रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याने त्यास मागणीही वाढली आहे. मागणीच्या तुलनेत साठा उपलब्ध नसल्याने इंजेक्शनचा काळाबाजार वाढल्याचे व जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या.
त्यामुळे रेमडेसिविरचा साठा व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी रेमडेसिविरचा औषध कंपन्यांकडून होणारा पुरवठा व वाटप याचे नियंत्रण करणार आहेत. सध्या जिल्ह्यात रेमडेसिविरचा मागणीएवढा साठा उपलब्ध नसल्याने आहे त्या इंजेक्शनचे नियोजन करण्यासाठी सर्व औषध दुकानांतून इंजेक्शन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबतचे आदेश जारी करताना आता केवळ कोविड रुग्णालय व कोराेनावर उपचाराची सुविधा देणाऱ्या रुग्णालयातील औषध दुकानांतच रेमडेसिविर उपलब्ध होणार आहे.