‘वाकुर्डे’चा कालवा फुटला

By admin | Published: July 24, 2014 10:59 PM2014-07-24T22:59:29+5:302014-07-24T23:10:51+5:30

मानकरवाडीतील घटना : दहाजणांचे प्राण प्रसंगावधानामुळे बचावले

The bark of 'Vakurde' | ‘वाकुर्डे’चा कालवा फुटला

‘वाकुर्डे’चा कालवा फुटला

Next

शिराळा : मानकरवाडी (ता. शिराळा) येथे वाकुर्डे योजनेचा कालवा फुटून पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने पन्नास एकर जमीन वाहून गेली. अचानक पाणी आल्याने शेतात काम करणाऱ्या सुमारे दहाजणांचे प्राण प्रसंगावधानामुळे बचावले. हा प्रकार काल (बुधवारी) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडला.
वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेचा एक कालवा वाकुर्डेकडून शिरसीकडे डोंगरास वळसा घालून जातो. तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामुळे या कालव्यातून तसेच डोंगरावरून प्रचंड वेगाने पाणी वहात या कालव्यात आल्याने मानकरवाडी गावाजवळील कालव्यास भगदाड पडले. या कालव्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडले. बबन नांगरे, मंगेश चव्हाण या युवकांनी पोती टाकून सुरूवातीस भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जोरदार असल्याने हे युवक कसेबसे जीव वाचवून बाजूला झाले. शेतात काम करणारे शेतकरीही आरडाओरडा करीत बाजूला झाले. या भगदाड पडलेल्या कालव्यापासून सुमारे एक किलोमीटरवर अंत्री-मानकरवाडी मध्यम प्रकल्प आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची शेती पाण्याने वाहून गेली, तर काहींच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साठले. यादरम्यान असणाऱ्या रस्त्याचेही नुकसान झाले. कालव्यापासून रस्त्यापर्यंत असणारी जवळजवळ पन्नास एकर क्षेत्रातील माती, पिके, बांध वाहून गेले.
बबन आनंदा नांगरे (आठ एकर), गजानन म्होप्रेकर, नंदाताई सुरेंद्र चव्हाण, मंगेश सुरेंद्र चव्हाण, जितेंद्र चव्हाण, मीरा चव्हाण, (सर्व रा. मानकरवाडी) यांची प्रत्येकी दोन एकर, शामराव जाधव, मारुती जाधव, संजय जाधव, (सर्व रा. आंबेवाडी), सुनील पाटील (रा. शिरशी), एकनाथ धुमाळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या शेतीची पूर्ण माती वाहून गेली. सुभाष म्होप्रेकर यांचे जवळजवळ ७० बाय ६० फूट आकाराचे तळेच या मातीने व पाण्याने भरले गेले. या पाण्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या फुटलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे अंत्री-करमजाई धरण अवघ्या चार तासात भरले व धरणाच्या सांडव्यातून पाणीही बाहेर पडले. (वार्ताहर)

Web Title: The bark of 'Vakurde'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.