आता महिनाभर दाढी, कटिंग घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:41+5:302021-04-09T04:27:41+5:30
सांगली : शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे महिनाभर सलून बंद राहणार असल्याने लोकांना आता घरातच दाढी, कटिंग करावी लागणार आहे. दुसरीकडे ...
सांगली : शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे महिनाभर सलून बंद राहणार असल्याने लोकांना आता घरातच दाढी, कटिंग करावी लागणार आहे. दुसरीकडे सलून व्यावसायिक या निर्णयाने हादरले असून, सलून कामगारांच्या पोटावर लॉकडाऊनने पाय दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सुमारे १५ हजार सलून व ब्युटी पार्लर आहेत. यावर जगणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. सलून बंद राहिल्यामुळे एकीकडे या चालक, कामगारांचा रोजगार बुडणार आहे, तर दुसरीकडे लोकांना आता महिनाभर घरातच दाढी व कटिंग करावी लागणार आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये प्रदीर्घ काळ लोकांना सलूनशिवाय व सलूनचालकांना ग्राहकांशिवाय राहावे लागले. मागील वर्षी झालेले नुकसान अद्याप भरून निघाले नसताना व्यावसायिकांना नव्या वर्षात पुन्हा त्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्यावसायिक व कामगार हादरले आहेत. यापुढे कोणत्याही प्रकारचे नुकसान आम्ही सहन करू शकत नाही, अशी भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली. अनेकांनी कर्ज काढून सलून व पार्लर सुरू केले होते. व्यवसाय बंद ठेवून केवळ कर्जाचे हप्ते व शासनाचे कर भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
चौकट
महापालिका क्षेत्रातील सलून व्यावसायिक ३०००
त्यावर अवलंबून असलेले कामगार ९०००
कोट
जिल्ह्याचा विचार केल्यास कामगार व त्यांचे कुटुंब असे लाखो लाेक या व्यवसायावर अवलंबून आहेत. व्यवसाय बंद करताना गतवर्षी शासनाने कोणतीही मदत या व्यावसायिकांना दिली नाही. आता पुन्हा लॉकडाऊनमुळे अनेक चालक, कामगार उद्ध्वस्त होतील. आजपर्यंत एकाही सलूनमुळे कोरोनाचा फैलाव झाला नाही. व्यावसायिक सर्व नियम पाळतात.
- शशिकांत गायकवाड, राज्य संघटक, महाराष्ट्र नाभिक महामंडळ
कोट
सलून बंद असेल तर कामगार व त्यांचे कुटुंब जगणार कसे? याचा विचार शासन का करीत नाही. शासनाने जगणे सोपे करण्याऐवजी अवघड करण्याच्या बाजूने निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घ्यावा.
- जयंत साळुंखे, सलून कामगार
कोट
सलून बंद ठेवल्यानंतर पाणीपट्टी, वीजबिल, घरपट्टी, शासनाचे अन्य कर, बँकांचे हप्ते हे सुरूच राहतात. त्याचा कधीही शासनाकडून विचार केला जात नाही. व्यवसाय बंद करून काय साध्य होणार आहे?
- शिवाजी डांगे, सलून व्यावसायिक, सांगली
कोट
वेळेचे बंधन घालण्यास, आठवड्यातून दोन दिवस लॉकडाऊन करण्यास आमचा विरोध नाही. महिनाभर दुकान बंद करून नुकसानीचा भार सहन करीत कर्जबाजारी होणे आम्हाला मान्य नाही.
- गणेश सन्मुख, सलून व्यावसायिक, सांगली