गोटखिंडीत शेतात पाणी सोडण्यावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:53+5:302021-01-15T04:22:53+5:30
आष्टा : गोटखिंडी ता. वाळवा येथील उमेश संभाजी जाधव वय ३६ याला शेतात पाणी सोडण्याच्या कारणावरून श्रीकांत जाधव, राजेंद्र ...
आष्टा :
गोटखिंडी ता. वाळवा येथील उमेश संभाजी जाधव वय ३६ याला शेतात पाणी सोडण्याच्या कारणावरून श्रीकांत जाधव, राजेंद्र जाधव या चुलत भावांनी धक्काबुक्की करीत दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवार दि. १२ रोजी सकाळी घडली.
आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोटखिंडी येथील उमेश जाधव याचे दोन दिवसापूर्वी चुलत भाऊ श्रीकांत जाधव, राजेंद्र जाधव यांच्यासोबत शेतात पाणी सोडल्याच्या कारणावरून वाद झाला होता. ही भांडणे मिटवण्यासाठी गट क्रमांक ७४० मध्ये उमेश जाधव, सुधीर जाधव यांच्यासह आत्येभाऊ तानाजी थोरात गेले होते. यावेळी उमेश जाधव याने आमच्या शेतात पाणी सोडून पिकाचे नुकसान का करता असे विचारले असता. दोन्ही चुलत भावांनी धक्काबुक्की करून खाली पाडले. श्रीकांत याने दगड फेकून उमेश जाधव यांच्या डोक्यात मारला. त्यास मोठी जखम झाल्यामुळे रक्त येऊ लागल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आले. जखमीवर आष्टा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार आर. आर. देशिंगे करीत आहेत.