आटपाडीकरांच्या पाण्याला मधमाशांचा अडथळा
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:32+5:302015-12-15T00:45:03+5:30
नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने : मोहोळ काढणाऱ्यांचा शोध; चाचणी रखडल्याने भटकंतीची वेळ
अविनाश बाड --- आटपाडी ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने’ या म्हणीप्रमाणे आटपाडीकरांच्या पाणीपुरवठा योजनेने अनेक अडथळे पार केल्यानंतर आता मधमाशांच्या मोहोळाचे विघ्न आले आहे. १६ कोटी खर्चाच्या, भारत निर्माण योजनेतून आटपाडीकरांसाठी केलेल्या या योजनेच्या पाण्याची चाचणी आता, सध्या जुन्या पाण्याच्या टाक्यांवर मधमाशांचे मोहोळ असल्याने थांबली आहे. ग्रामपंचायतीचे कारभारी, ‘कुणी मोहोळ काढता का मोहोळऽऽ?’ असे म्हणत मोहोळ काढणाऱ्यांच्या शोधात आहेत.आटपाडी गावाची वाढती लोकसंख्या आणि जुनाट झालेली पाणीपुरवठा योजना, यामुळे येथे पाणीटंचाई कायमचीच असते. त्यात आटपाडी तलावातून थेट सायफनने पाणी विहिरीत टाकून ते पाणी गावाला पुरविले जाते. भारत निर्माण योजनेतेतून जलशुध्दीकरण प्रकल्पासह नवी योजना झाल्याने गावाला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली. ही योजना थेट आटपाडी तलावातून पाणी आणून ते शुध्द करुन गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांना पुरवठा होणार आहे.
या योजनेचे पाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या भवानी हायस्कूलच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या टाक्यांमध्ये सोडण्यात आले. हे पाणी जुन्या योजनेच्या तुलनेत कमी दाबाने पडत असल्याचे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कमी पाणी आल्याने टाक्या भरण्यास वेळ लागतो. त्यामुळे गावाला वेळेत पाणी मिळत नाही.वास्तविक जुन्या पाणी पुरवठा योजनेकडे २० अश्वशक्तीच्या दोन मोटारी आहेत. नव्या योजनेत ४० अश्वशक्तीच्या पंपाने तलावाजवळील पाण्याच्या टाकीत पाणी सोडून ते सायफन पध्दतीने गावातील टाकीमध्ये सोडण्यात येत आहे. ‘सायफन’ने पाण्याचा दाब अधिक येणे अपेक्षित आहे. यावर प्रत्यक्षात टाकीवर दोन्हीही योजनांचे पाणी किती दाबाने पडते, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी अभियंत्यांना टाकीवर चढून पाहणी करावयाची आहे. पण भवानी हायस्कूलच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाक्या २० वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत. त्या टाक्यांवर मधमाशांनी मोहोळ तयार करून पिंगा घातला आहे. प्रत्येक टाकीला तीन ते चार मोहोळ आहेत. काही जुनाट मोहोळांनी टाकीला जुनाट दाढीचे स्वरुप दिले आहे. त्यामुळे कुणीही टाकीवर जाणाचा प्रयत्न केल्यास त्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजना होऊनही आटपाडीकरांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
नव्या योजनेचे पाणी कमी वेगाने टाक्यांमध्ये पडत असल्याची पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी टाकीवर प्रत्यक्ष जाण्यासाठी मोहोळ काढणाऱ्या माहीतगारांचा शोध घेत आहोत.
- स्वाती सागर, सरपंच, ग्रामपंचायत आटपाडी
टाकीत प्रत्यक्ष पाणी किती दाबाने पडते हे पाहिल्यानंतर, आवश्यक ती तांत्रिक सुधारणा करता येणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना टाक्यांवरील मोहोळ काढण्यास सांगितले आहे. ते काढताच २-३ दिवसात पाणी पुरवठा सुरू करणे शक्य आहे.
- ए. आर. आत्तार, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, विटा.
पाणी हवे असेल तर : आधी लगीन मधमाशांचे
आटपाडीला पिण्याचे शुध्द पाणी मिळायचे असेल, तर आधी पाण्याच्या टाक्यांवरील मधमाशांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी मधमाशांवर मात करणाऱ्या शूरांच्या शोधात गावाचे कारभारी आहेत. या पाण्याच्या टाक्यांवर गेल्या २० वर्षात कुणीही चढलेले नाही. त्यामुळे पायऱ्याही निकामी झाल्या आहेत. गेल्या २० वर्षात या गावाला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्याही कधी धुतलेल्या नाहीत. नागरिकांची तरीही अस्वच्छ पाण्याबद्दल तक्रार नाही. कसले का असेना, पाणी मिळावे, एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.