खानापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कुस्ती क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. परंतु दानशूर व्यक्तींनी कुस्ती मल्लविद्या जिवंत ठेवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. बेणापूर (ता. खानापूर) येथील कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्रातील मल्लांसाठीही अशी मदत आली आहे.
गेल्या वर्षापासून गावोगावी यात्रेनिमित्त भरणारी कुस्ती मैदाने बंद झाली आहेत. त्यातच
घरची परिस्थिती नाजूक असूनही कुस्ती कला जोपासणे पैलवानांना अवघड बनले आहे. खुराकासाठी लागणाऱ्या खर्चाचा मोठा बिकट प्रसंग पैलवांनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना कुस्ती क्षेत्रात टिकून राहणे मुश्किलीचे झाले आहे.
या परिस्थितीत पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनचे अध्यक्ष अजित शिंदे यांच्या सहकार्याने व बेणापूर येथील संपतराव जाधव, रणजित भोसले यांच्या सहाय्याने बेणापूरच्या कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्रातील प्रत्येक पैलवानाला बदाम व तूप आदी खाद्य देण्यात आले. यामुळे पैलवानांना या बिकट काळात मदत झाली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, बेणापूर सर्व सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, जयकिसन शिंदे, संपतराव जाधव, रणजित भोसले, विठ्ठलसिंग रजपूत, आशिष शिंदे उपस्थित होते. कुस्ती केंद्रांचे वस्ताद राजेंद्र शिंदे यांनी पैलवानाच्या वतीने मदत* केलेल्या मान्यवराचे आभार मानले. महाराष्ट्राची कुस्ती लोकाश्रयातूनच टिकून राहिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध तालमीतील पैलवानांना दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपापल्या परीने मदत* करण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.