कोंबड्या, कावळे व इतर स्थलांतरित पक्ष्यांना होणारा विषाणूजन्य आजार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांत कावळे, वन्यपक्षी व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कता व विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पाळीव पक्षी. जलायशावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात येत आहे. पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यास किंवा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्यास याबाबत माहिती देण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मिरज, कवठेमहांकाळ व कडेगाव तालुक्यामधील पोल्ट्रींमधून पक्ष्यांच्या रक्ताचे नमुने संकलित करून रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर दक्षता पथक स्थापण्यात आले आहे. बर्ड फ्लू रोग प्रादुर्भाव व प्रसाराबाबत प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने कोंबड्यांची खुराडी, गुरांचे गोठे, गावातील गटारी, पशु-पक्ष्यांचा वावर असलेल्या ठिकाणी औषध फवारणीच्या सूचना दिल्या आहेत. सर्व पोल्ट्रीफार्मचालकांनी प्रादुर्भाव झालेल्या संशयित फार्मवरून पक्ष्यांची वाहतूक, विक्री, खरेदी, खाद्य वाहतूक पूर्ण थांबवावी. सद्यस्थितीत जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झालेली नाही; मात्र पोल्ट्रीफार्मवर जैवसुरक्षा उपाययोजना करून या रोगाचे संक्रमण रोखण्यात येत असल्याचे पशुसंवर्धनचे सहायक उपायुक्त डाॅ. सदाशिव बेडक्याळे यांनी सांगितले.