सांगली : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यात कडकडीत, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यासह सांगली, मिरज शहरात संमिश्र, तर विटा, जत व मिरज तालुक्यात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यात आंदोलनाचे वेगवेगळे चित्र दिसून आले. काही ठिकाणी कडकडीत, काही ठिकाणी संमिश्र, तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद दिसत होता. रिक्षा, खासगी वाहतूक, बसवाहतुकीवर, तसेच शाळा, महाविद्यालयांवर या आंदोलनाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
काही ठिकाणी आठवडा बाजार बंद राहिले, तर वाळवा येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी बसेस अडविल्या. अन्यत्र कुठेही बससेवा खंडित झाली नाही.