बिजलीमल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांचे सांगलीत निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:16 AM2021-03-15T08:16:05+5:302021-03-15T08:18:29+5:30
former MLA Sambhaji Pawar: गेली काही वर्षे ते पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली.
सांगली : कुस्ती सुरू होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच प्रतिस्पर्धी मल्लाला धोबीपछाड देण्याची खासियत असणारे बिजली मल्ल आणि सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार (वय ८०) यांचे (Sambhaji Pawar) मध्यरात्री निधन झाले. सांगली मतदारसंघातून ते चारवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. (Former MLA Sambhaji Pawar passed away in Sangli.)
गेली काही वर्षे ते पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले.
महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्व. वसंतरावदादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी 'जायंट किलर' अशी ख्याती मिळवली. १९८६ ते १९९९ पर्यंत तीनवेळा जनता दलाकडून, तर एकदा (२००९ ते २०१४) भाजपकडून त्यांनी विधानसभेचे मैदान मारले.
शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती.
२००९ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. २००१४ साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीयदृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते मते मांडत असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.