बिरोबा सोसायटीची ९३ वर्षांनी निवडणूक
By admin | Published: October 30, 2015 11:50 PM2015-10-30T23:50:05+5:302015-10-31T00:09:55+5:30
बोरगावात चुरस : चुलत बंधू आमने-सामने
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील बिरोबा विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल ९३ वर्षांनी होत आहे. या निवडणुकीत चुलत बंधू आमने-सामने आल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत.
बोरगाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव मानले जाते. या गावातील सर्व सेवा सोसायट्या, पतसंस्थेच्या निवडणुका बिनविरोध होत असताना, तब्बल ९३ वर्षांनी बिरोबा विकास सेवा सोसायटीची निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटात ही निवडणूक होत आहे. कृष्णा कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह शिंदे यांचे बिरोबा विकास पॅनेल व माजी सरपंच प्रकाश पाटील यांचे लोकनेते राजारामबापू सहकार पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे गावाबरोबरच तालुक्याच्या नजरा या निवडणुकीकडे आहेत.
उदयसिंह शिंदे हे एकाकी पडले असून प्रकाश पाटील यांच्या पॅनेलला काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. उदयसिंह शिंदे यांच्या बिरोबा विकास सोसायटी पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह असून, प्रकाश पाटील यांच्या राजारामबापू पॅनेलला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. १ नोव्हेंबरला निवडणूक होत असून प्रचार व मतदारांच्या गाठीभेटी, बैठकांमुळे निवडणुकीत रंग भरला आहे.
वैयक्तिक भेटीगाठीवर भर देण्यात आला असून, सभासद फोडाफोडीला दोन्ही गटाकडून सुरुवात झाली आहे. एकूणच सोसायटीची सत्ता कोणाकडे जाणार, यावर पैजा लागल्या असून साऱ्या तालुक्याचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिले आहे. (वार्ताहर)
निवडणूक प्रतिष्ठेची
प्रकाश पाटील यांच्याकडे तगडे उमेदवार व सर्व नेत्यांची ताकद आहे, तर उदयसिंह शिंदे यांच्याकडे अनेक वर्षांच्या वडिलोपार्जित एकहाती सत्तेचा अनुभव आहे. एकूणच ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असून, प्रतिष्ठेची बनली आहे.