महापौर सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर हे मंगलधाम संकुलात एका बैठकीसाठी गेले होते. बैठक संपल्यानंतर ते बाहेर पडत असतानाच जन्म-मृत्यू कार्यालयासमोर नागरिकांची गर्दी दिसली. यावेळी नागरिकांनी दाखले वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी महापौरांकडे केल्या. त्यामुळे महापौर सूर्यवंशी चांगलेच संतप्त झाले. त्यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. ‘जन्म-मृत्यू दाखल्याची ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करा, तुम्हाला जमत नसेल तर सांगा, पुढचे महापालिका पाहून घेईल. यापुढे दाखले वेळेत मिळत नसल्याची तक्रार येता कामा नये’, अशी तंबीच त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली. महापौरांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांनी यापुढे असे होणार नाही, याची ग्वाही दिली.
नागरिकांना सुलभ आणि तत्काळ जन्म-मृत्यूचे दाखले मिळावेत, यासाठी ऑनलाइन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र नेटवर्क तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे नागरिकांना दाखले वेळेत उपलब्ध होत नाहीत. ज्या नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया माहीत नाही, ते दाखले घेण्यास जन्म-मृत्यू नोंदणी विभागात येतात; मात्र इथेही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत तातडीने यंत्रणा सक्षम करण्याची सूचना केल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.