इस्लामपूर : राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला असला तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या नादात शिवसेनेच संपत चालली आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. भल्याभल्यांचे मनसुबे धुळीस मिळवत भाजपने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार पेठनाका येथे महाडिक बंधूंच्या ‘सम्राट’ बंगला परिसरात झाला. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सी. बी. पाटील, सम्राट महाडिक, विक्रम पाटील यांची उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पृथ्वीराज देशमुख, राहुल महाडिक, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, स्वप्नील पाटील, परशुराम नागरगोजे, रमेश साबळे, विठ्ठल खोत यांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष आहे. पोटनिवडणुकांमध्ये भाजपने २१ जागा जिंकत पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष चिन्हावर लढविणार आहोत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी सग्यासोयऱ्यांची काळजी न करता पक्षहिताला प्राधान्य दिले. त्यामुळे अनेकांचे डावपेच उधळून लावत चार जागांवर विजय मिळाला. ज्यांचा पराभव झाला त्यांना ताकद दिली जाईल.
शिवाजीराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षाने अस्तित्व दाखवून दिले आहे. यापुढील निवडणुका आणखी जिद्दीने लढवू.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले, किमान आठ जागा निवडून येतील, असा अंदाज होता. त्यातील चार उमेदवार निवडून आले. काही ठिकाणी चुका झाल्या, त्या भविष्यात न करता पक्षाची ताकद वाढवू.
सम्राट महाडिक म्हणाले की, निवडून किती आले, यापेक्षा लढले कसे आणि किती याला महत्त्व आहे. पूर्वतयारी केली असती तर बँकेत वेगळे चित्र दिसले असते. यापुढे एकसंघपणे निवडणुका लढवू.
सुजित थोरात यांनी सूत्रसंचालन केले. स्वरूपराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी, कपिल ओसवाल, चेतन शिंदे, निजाम मुलाणी, राजन महाडिक, धैर्यशील मोरे, सतीश महाडिक, अमित ओसवाल, जलाल मुल्ला, गजानन फल्ले, मन्सूर मोमीन, जयराज पाटील, केदार नलवडे, सुखदेव पाटील उपस्थित होते.