जयंतरावांविरोधात भाजप की विकास आघाडी? : वेध विधानसभेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:01 AM2017-12-09T01:01:44+5:302017-12-09T01:02:52+5:30

इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात परिवर्तन घडवू, अशी प्रतिज्ञा v

BJP's development front against Jayantrawan? : Perforating Legislature | जयंतरावांविरोधात भाजप की विकास आघाडी? : वेध विधानसभेचे

जयंतरावांविरोधात भाजप की विकास आघाडी? : वेध विधानसभेचे

googlenewsNext
ठळक मुद्दे मोळी बांधण्याआधीच विरोधकांचे गुडघ्याला बाशिंगलोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक आहे

अशोक पाटील ।
इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात परिवर्तन घडवू, अशी प्रतिज्ञा भाजपच्या बैठकीत केली आहे. परंतु खा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या दरीमुळे भाजप आणि विकास आघाडीतील अंतरही रुंदावत चालले आहे. असे असतानाही पुन्हा एकदा मोळी बांधण्याआधीच विरोधकांनी विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यात संपर्क वाढवला आहे. जत नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी मंत्री खोत प्रयत्नशील आहेत. याउलट इस्लामपूर मतदारसंघात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाजपच्या मेळाव्याच्या निमित्ताने थेट जयंत पाटील यांनाच आव्हान दिले आहे. आगामी विधानसभेला राष्ट्रवादीविरोधी आघाडीतून कोण उमेदवार असणार, यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. त्यातच हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करुन जयंत पाटील यांना आव्हान देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र याला नायकवडी यांनी दुजोरा दिलेला नाही. नायकवडी यांची भूमिका नेहमीप्रमाणेच गुलदस्त्यात आहे.

इस्लामपूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधकांना एकत्र आणण्याचे श्रेय खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, गौरव नायकवडी यांना जाते. परंतु शेट्टी- खोत यांच्यातील दुराव्यामुळे विकास आघाडीची बांधलेली मोट विस्कटली आहे. त्यामुळे आ. नाईक यांची विकास आघाडी, महाडिक आणि हुतात्मा गट यांच्या भूमिका संदिग्ध राहिल्या आहेत. या नेत्यांचा विचार न करताच भाजपने जयंत पाटील यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

नानासाहेब महाडिक यांचे पुत्र राहुल महाडिक यांनी इस्लामपूर मतदारसंघात इच्छुक असल्याचे वेळोवेळी संकेत दिले आहेत. पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत महाडिक गटाने राष्ट्रवादीच्या विरोधकांना ताकद दिली आहे. यावेळी महाडिक गटाची ताकद विकास आघाडीला उपयोगी पडली. राष्ट्रवादीतून आलेल्या निशिकांत पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात नगराध्यक्षपद मिळवले.याच आधारावर आगामी विधानसभा निवडणुकीत ते जयंत पाटील यांना आव्हान देण्याची भाषा करु लागले आहेत. विस्कळीत झालेली मोळी पुन्हा एकदा बांधण्याआधीच विरोधकांनी विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

उमेदवार कोण?
आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक आहे. गत लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार कोण, असा प्रश्न होता. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उमेदवारी दिली गेली. आता आगामी लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातील समीकरणे ठरण्याआधीच विरोधकांनी आमदार जयंत पाटील यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: BJP's development front against Jayantrawan? : Perforating Legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.