सांगली : कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे बेकरी उत्पादनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय सांगली, मिरज, कुपवाड बेकरी व स्वीटस असोसिएशनने घेतला आहे. सचिव कृष्णराव माने यांनी ही माहिती दिली.बेकरी व्यावसायिकांच्या बैठकीत सहा निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालक नावेद मुजावर, कृष्णराव माने, अर्शद के. पी., असिफ भोकरे, बसवराज अय्यंगार, महेश नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, बेकरी उत्पादनांसाठीच्या मैदा, वनस्पती तूप, मार्गारीन, पॅकिंग आदी साहित्याची गेल्या काही महिन्यांत भरमसाठ वाढ झाली आहे. विशेषत: तेल, तूप यांच्या दरवाढीची झळ गंभीर आहे. त्यामुळे बेकरी उत्पादनांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सर्व उत्पादनांच्या किमतीत २० ते २५ टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे.२५ रुपयांचा ब्रेड आता ३० रुपयांना घ्यावा लागेल. खारी प्रतिकिलो २४० रुपयांवरून २८० ते ३०० रुपये किलोंवर गेली आहे. टोस्ट, बटर, बिस्किटे यांच्या किमतीतही १० ते ३० रुपयांची वाढ होणार आहे. चॉकलेट टोस्ट, नानकटाई, केक, ढोकळा, फापडा, साधे पाव यांचीही दरवाढ झाली आहे.मुजावर यांनी सांगितले की, कच्च्या मालाचे भाव वाढले, तरी संघटनेने वर्षभरापासून उत्पादनांच्या किमती वाढवल्या नव्हत्या. पण सध्या कच्च्या मालाचे दर आवाक्याबाहेर गेल्याने उत्पादनांच्या किंमती वाढवाव्या लागल्या आहेत.
ब्रेड, बटर, केक, खारी, ढोकळा झाला महाग; दरवाढीचा बेकरी असोसिएशनचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2024 4:29 PM