संसर्गाची साखळी तोडू, साथ नियंत्रणात आणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:01+5:302021-04-15T04:25:01+5:30
फोटो : १४०४२०२१प्रिया प्रभू कोणत्याही रोगाला नियंत्रित करायचे असेल, तर ‘ब्रेक द चेन’ला पर्याय नाही. चांगला डॉक्टर केवळ रुग्ण ...
फोटो : १४०४२०२१प्रिया प्रभू
कोणत्याही रोगाला नियंत्रित करायचे असेल, तर ‘ब्रेक द चेन’ला पर्याय नाही. चांगला डॉक्टर केवळ रुग्ण बरा करत नाही, तर त्याच्यापासून इतरांपर्यंत आजार फैलावू नये म्हणून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी योग्य ते सल्लेही देतो. आजार निर्माण करणाऱ्या बहुतांश जंतूंना सहसा शरीराबाहेर जगता येत नाही.
जंतूंच्या दृष्टीने त्यांचे जीवनध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जंतूला रुग्णाच्या शरीरातून बाहेर निघण्याचे दार वापरून विविध मार्गांनी नव्या संसर्गक्षम व्यक्तीच्या शरीरामध्ये शिरून संसर्ग निर्माण करावाच लागतो, नाहीतर जंतू जगू शकत नाहीत.
मानवाच्या दृष्टीने मात्र प्रत्येक जंतूची संसर्गशृंखला समजून घेऊन ती साखळी तोडून जंतूंची वाढ, पर्यायाने रुग्णांची वाढ रोखणे महत्त्वाचे असते. आजअखेर ज्या-ज्या रोगांवर मानवाने नियंत्रण मिळवले आहे, ते ‘ब्रेक द चेन’ याच मार्गाने मिळवले आहे. आता हा उपाय आपण कोरोनाविरुद्धही वापरत आहोत.
तो उपाय कसा वापरत आहोत, ते पाहू : शृंखलेतील कडी आणि त्यावरील उपाय :
१. जंतू (कोरोना विषाणू) : जंतुनाशकांचा वापर (सॅनिटायझर).
२. विषाणूचे भांडार (रुग्ण) : संसर्ग झाल्यास विलगीकरण (आयसोलेशन), उपचार, रुग्णाशी संपर्क आल्यास १४ दिवस अलगीकरण (क्वारंटाइन), लक्षण सुरू होताच तपासणी.
३. शरीराबाहेर पडण्याचा मार्ग (नाक किंवा तोंड) : मास्कचा सुयोग्य वापर.
४. प्रसाराचे मार्ग (हवेतून किंवा पृष्ठभागावरून) : अंतर राखणे, गर्दी टाळणे, बंदिस्त जागी न जाणे, वायुविजन वाढवणे, मास्क न काढणे, पृष्ठभाग निर्जंतुक करणे, हातांची स्वच्छता, एकत्र न खाणे किंवा पिणे.
५. प्रवेशाचे मार्ग (नाक, तोंड, डोळे) : चेहऱ्याला, नाकतोंडाला स्पर्श न करणे, मास्क वापरून नाक व तोंड सुरक्षित ठेवणे, शिल्ड किंवा गॉगल्स वापरणे.
६. संसर्गक्षम व्यक्ती : मास्कचा योग्य वापर अनिवार्य, कामाशिवाय इतरांना न भेटणे, लसीकरण, आरोग्यपूर्ण जीवनशैली.
गेल्या मार्चपासून ही शृंखला तोडण्यासाठीच सरकारने विविध नियम केले होते. मात्र, जनतेने ते मनापासून पाळले नाहीत. प्रशासनास एकजुटीने सहकार्य केले नाही. जनतेने हे नियम पाळले नसल्यामुळेच कोरोनाचे फावले. कोरोनासाठी ही संसर्गशृंखला बळकट झाली आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. अशावेळी सरकारला ही शृंखला तोडण्यासाठी विविध निर्बंध घालावे लागतात आणि तरीही साखळी तुटली नाही की, मग दोन ते चार आठवड्यांचा लॉकडाऊन करावा लागतो.
लॉकडाऊन केल्याने ही शृंखला कशी तोडली जाते हे पाहू :
१. विषाणूचे भांडार असलेल्या रुग्णांनी स्वतःच्या घरी थांबावे. बाहेर पडून संसर्ग फैलावू नये. (लक्षणे येण्यापूर्वी दोन दिवस संसर्ग फैलावण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्यात रुग्णाची चूक असतेच, असे नाही) लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार घेणे अपेक्षित आहे.
२. जे कळत-नकळत एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्गित झाले आहेत, मात्र अजून लक्षणे दिसत नाहीत, अशांनीही स्वतःच्या घरी थांबावे. १४ दिवसांमध्ये त्यांची लक्षणे दिसू लागतात आणि त्यांच्यापासून पुढे होणारा प्रसार थांबतो.
३. संसर्गक्षम व्यक्तीनेही स्वतःच्या घरामध्येच थांबावे. बाहेर पडायचे नसल्याने त्यांचा संपर्क बाधित व्यक्तींसोबत येत नाही आणि त्यामुळे संसर्गाची ही साखळी तोडली जाते. साथ थांबवायची असेल तर एका रुग्णापासून आजार दुसऱ्याकडेही जाता कामा नये.
आता आपण ही शृंखला तोडली नाही, तर रुग्णसंख्या अमर्याद वाढेल आणि प्रतिदिवशी हजारो मृत्यू होतील. हे टाळणे केवळ आपल्याच हातात आहे.
(लेखिका मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका असून, साथरोगतज्ज्ञ आहेत.)