सांगली : येथील कॉलेज कार्नरवरील आयकर सल्लागार सुहास विठ्ठल देशपांडे यांच्या बंगल्यावर सोमवारी पहाटे चार ते पाच जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. बंगल्यातील कामगार नारायण चन्नाप्पा गुड्डी (वय ४२) यास बेदम मारहाण केली. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याचे हात-पाय बांधले. सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली आहे. अत्यंत गजबजलेल्या भरवस्तीत सशस्त्र दरोडा पडल्याने शहरात खळबळ माजली आहे.सुहास देशपांडे शनिवारी सकाळी कुटूंबासह पुण्याला नातेवाईकांच्या लग्नाला गेले आहेत. घरातील सफाई कामगार नारायण गुड्डी यास बंगल्यात झोपण्यास सांगितले होते. गुड्डी गेल्या वीस वर्षापासून देशपांडे यांच्याकडे कामाला आहे. तो शंभरफुटी रस्त्यावरील डी-मार्टमागे राहतो. रविवारी रात्री तो जेवण करुन देशपांडे यांच्या बंगल्यात झोपण्यास गेला. तो हॉलमध्ये झोपला होता.
जखमी नारायण गुड्डी
सोमवारी पहाटे चार वाजता चार ते पाचजणांच्या टोळीने देशपांडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागून बेडरुमच्या खिडकीचे गज कापून प्रवेश केला. हॉलमध्ये झोपलेल्या गुड्डी यांच्यावर हल्ला केला. त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अनपेक्षित घडलेल्या या प्रकारामुळे गुड्डी घाबरुन गेला. टोळीतील दोघांच्या हातात रिव्हॉल्व्हर व चाकू होता. तोंडातून आवाज काढलास तर गोळ्या घालून डोळे बाहेर काढेन, अशी गुड्डीला धमकी दिली. चादर फाडून गुड्डीचे हात-पाय बांधले. तसेच तोंडाला चिकटपट्टीही बांधली.
देशपांडे यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर तीन बेडरुम आहेत. या सर्व बेडरुममधील सात ते आठ कपाटे फोडली. त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरही फोडली. त्यामधील किती ऐवज लंपास केला आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. देशपांडे पुण्याहून आल्यानंतरच माहिती समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
पहाटे पाचपर्यंत टोळीचा बंगल्यात धिंगाणा सुरु होता. गुड्डी जागेवरुन हलू नये, यासाठी त्याच्याजवळ दोेघेजण बसले होते. तोंडाला चिकपट्टी बांधल्याने त्याला ओरडताही आले नाही. पहाटे पाच वाजता दरोडोखोरांची ही टोळीबंगल्यातून निघून गेली. त्यानंतर गुड्डी याने चादरीने बांधलेले हात-पाय सोडवून घेऊन थेट शहर पोलिस ठाणे गाठले.
ओरडू नये, यासाठी गुड्डीचा गळा दाबलाबंगल्यात प्रवेश केल्यानंतर टोळीने गुड्डीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला झोपेतून उठवण्याची संधीही दिली नाही. प्रथम त्याचा गळा दाबून त्याने ओरडू नये, यासाठी धमकी दिली. त्यानंतर एकाने गळ्याला चाकू लावला, तर दुसऱ्याने रिव्हॉल्व्हर काढून त्याच्या डोक्याला लावले.बंगल्यापासून काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळलेटोळीतील दरोडोखोरांचा माग काढण्यासाठी सकाळी अकरा वाजता श्वान पथकास पाचारण केले होते. श्वान बंगल्यापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. ठसे तज्ञांनाही पाचार केले होते. ठसे मिळविण्यासाठी तब्बल दोन तास प्रयत्न सुरु होते. प्रत्येक बेडरुममधील साहित्यावरील ठशांचा शोध सुरु होता.
टोळीतील चौघांनी बांधले होते तोंडाला मास्क टोळीतील चौघांनी तोंडाला मास्क बांधले होते. साधारपणे ते २५ ते ३० वयोगटातील असावेत, अशी माहिती गुड्डी याने पोलिसांना दिली आहे. ते मराठीत बोलत होते. जाताना त्यांनी गुड्डीचा मोबाईल लंपास केला आहे. दरोड्याचे वृत्त समजताच विश्रामबाग पोलिस, गुंडाविरोधी पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गुड्डीची कसून चौकशी करुन त्याच्याकडून या घटनेची माहिती घेतली.हद्दीचा वाद सुरुचसुहास देशपांडे यांचा बंगला विश्रामबागहद्दीत येतो. पण याची माहिती गुड्डीला नव्हती. ते थेट शहर पोलिस ठाण्यात गेला. त्याने घडलेली मािहती दिली. मात्र शहर पोलिसांनी हा आमच्या हद्दीत प्रकार घडला नसूल, तू विश्रामबाग ठाण्यात तक्रार दिली पाहिजेस, असे सांगितले. तरीही हद्दी ठरविण्यावरुन शहर पोलिसांनी गुड्डीला अर्धा तास बसवून घेतले. हद्द निश्चित झाल्यानंतर मग विश्रामबाग पोलिसांना कळविले. परंतु तातडीने गुड्डीला सोबत घेऊन बंगल्यात भेट देण्याची तत्परता शहर पोलिसांना दाखविता आले नाही.