कर्णकर्कश हाॅर्न पोलिसांना ऐकू येत नाहीत का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:19+5:302021-06-25T04:19:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाहनाच्या प्रकारानुसार हाॅर्नचा आवाज किती असावा, याचे नियम ठरलेले आहेत. तरीही रस्त्यावर चित्रविचित्र हाॅर्नचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाहनाच्या प्रकारानुसार हाॅर्नचा आवाज किती असावा, याचे नियम ठरलेले आहेत. तरीही रस्त्यावर चित्रविचित्र हाॅर्नचे आवाज ऐकू येत असतात. विशेषत: तरुणांच्या दुचाकींना अशा प्रकाराचे फॅन्सी हाॅर्न सर्रास बसविलेले असतात. अनेकदा पोलिसांना चकवा देण्यासाठी दोन हाॅर्नही वाहनांना असतात. अशा कर्णकर्कश हाॅर्नमुळे अपघाताबरोबरच कानाला त्रास होण्याचा धोका अधिक असतो.
तरुणांकडून रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीला कर्णकर्कश हाॅर्न बसविले जात आहेत. या हाॅर्नचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असतो. असे हाॅर्न नागरिकांच्या जवळ येऊन वाजविल्यास त्याचा कानाला त्रास होतो. शिवाय समोरचा वाहनचालक घाबरल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. हे कर्णकर्कश हाॅर्न पोलिसांना ऐकू येत नाहीत का, असा प्रश्न अनेकदा पडतो.
चौकट
फॅन्सी हाॅर्नची फॅशन
१. जनावरांचे आवाज, रुग्णवाहिका, पोलीस वाहनाच्या आवाजाचे हाॅर्न दुचाकीला बसविलेले असतात. एका ट्रकमध्ये तर गाण्याच्या चालीचा हाॅर्न बसविला आहे. काही जण सायलन्सर काढून दुचाकी पळवीत असतात.
२. शहरात अनेक रेसिंग बाइक आहेत. त्या रस्त्यावर भरधाव जात असतात. त्याचा आवाजही मोठा आहे. त्याच्या जोडीला अशा बाइकला फॅन्सी हाॅर्न बसविल्याने मर्यादेपेक्षा मोठा आवाज होतो.
चौकट
कर्णकर्कश हाॅर्न वाजविला तर...
१. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार शांतता झोन परिसरात मर्यादेपेक्षा ध्वनीपातळी अधिक असल्याचे सिद्ध झाल्यास वाहनचालकाला पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
२. वाहतूक पोलिसांकडून कर्णकर्कश हाॅर्न असलेली वाहने आरटीओकडे पाठविली जातात. तिथे कंपनीमेड हाॅर्नची तपासणी होते. त्यात बदल केला असेल तर एक हजार रुपये दंड केला जातो.
चौकट
कानाचे कायमस्वरूपी नुकसान
- कर्णकर्कश हाॅर्न, सायलन्सर काढून वाहने पळविणे, ध्वनिक्षेपक यांच्या अमर्याद आवाजामुळे कानाचे कायमस्वरूपी नुकसान होते, असे कान, नाक, घसातज्ज्ञ डाॅ. शशिकांत दोरकर यांनी सांगितले.
- मोठ्या आवाजामुळे कानाच्या नसांना दुखापत होते. नसा कमकुवत होतात. त्याचा परिणाम तात्काळ जाणवत नाही. हळूहळू कानावर त्याचा परिणाम होत असतो.
- नसांची ताकद कमी झाल्यास ऐकण्यास कमी येऊ लागते. त्यावर उपचार करूनही ऐकण्याची क्षमता वाढू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
कोट
वाहतूक शाखेकडून कर्णकर्कश हाॅर्नप्रकरणी कारवाई सुरूच असते आणि ती सुरूच राहणार आहे. वाहनचालकाला एक हजार रुपये दंडासोबतच आम्ही तो हाॅर्न काढून घेतो. कर्णकर्कश हाॅर्न असलेल्या वाहनांवर, दुचाकीवर कारवाईसाठी लवकरच विशेष मोहीम हाती घेणार आहोत.
- प्रज्ञा देशमुख, निरीक्षक, वाहतूक शाखा.