इस्लामपूर : कोरोनाच्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही वाढत आहे. रोज सरासरी दहा मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाकडे आहे. परंतु मृतदेह दहन करताना निष्काळजीपणा होत असल्याने अर्धवट जळालेला अवयव या परिसरात अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आल्याने या परिसरातील नगरसेविका सुुप्रिया पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
याबाबत स्मशानभूमीतील पालिकेचे प्रमुख दिलीप कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता अर्धजळीत मानवाचे अवयव आहेत का, याबाबत डॉक्टर तज्ज्ञांकडून शहानिशा केली जात आहे. स्मशानभूमीच्या पलीकडे मेलेल्या जनावरांचे मृतदेह टाकले जातात. रात्रीच्या वेळी अर्धवट जळालेले मानवी अवयव भटक्या कुत्र्यांकडून पळविले जात असल्याचा संशय पालिका कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह मृत रुग्णांचे दहन करण्यासाठी एकूण पाच कर्मचारी आहेत. परगावातील मृतांसाठी सात हजार रुपये आणि इस्लामपुरातील मृतांसाठी २१०० रुपये घेतले जातात.
सध्या मृत्यूची संख्या पाहता मृतदेह दहन करण्यासाठी विलंब लागत आहे. या परिसरात घरकुल योजनेतील लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना निर्माण होणारा धुराचा त्रास सहन करावा लागत असल्याने कोरोनाबाधित मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी इतरत्र जागा बघावी, अशी मागणी यापूर्वी नगरसेविका मनीषा पाटील यांनी केली होती. यावेळेची परिस्थिती अशीच असल्याने पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी केली आहे.