संतोष भिसे सांगली : सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने परीक्षा शुल्क परत मिळणार काय? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. देश-विदेशातील १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी ४५० कोटींहून अधिक रक्कम बोर्डाकडे जमा केली आहे.
सीबीएसई बोर्डाच्या देश-विदेशात २२ हजार शाळा आहेत. बोर्डाने दहावीच्या परीक्षांसाठी ऑक्टोबरमध्येच फॉर्म भरुन घेतले होते. प्रत्येकी १ हजार ८५० रुपये परीक्षा शुल्क घेतले. सहा विषयांव्यतिरिक्त जादा विषयांसाठी ३०० रुपये अतिरिक्त घेतले. सुमारे १९ लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पण लॉकडाऊनमुळे परीक्षा रद्द केल्याने ३५० कोटींचे परीक्षा शुल्क बोर्ड परत करणार काय असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. बोर्डाने परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करताना परीक्षा शुल्काविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही.प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, स्टेशनरी व अन्य वाहतुकीचा खर्च परीक्षा शुल्कातून केला जातो. आजमितीस छपाई झाल्याचे मान्य केले तरी प्रतिविद्यार्थी ३०० रुपयांचा खर्च वगळून उर्वरीत १३५० रुपये परत करावेत असा पालकांचा सूर आहे. लॉकडाऊन काळात पालकांची आर्थिक कोंडी झालेली असताना बोर्डाने विविध शुल्कांमध्ये कोणतीही सवलत दिली नव्हती, या स्थितीत परीक्षा शुल्क परत करणे ही बोर्डाची जबाबदारी असल्याचा दावा पालकांनी केला.शिक्षक प्रशिक्षणाचे १०० कोटी अडकलेदरम्यान, सीबीएसईच्या शिक्षकांसाठी बोर्डाने यंदापासून प्रशिक्षण कार्यशाळा सुुरु केल्या आहेत. प्रत्येकी १५०० रुपये भरुन वर्षभरात किमान १५ प्रशिक्षण वर्गांना हजेरी सक्तीची आहे. सुमारे सात लाख शिक्षकांनी १०० कोटी रुपये जमा केले आहेत. कोरोना व लॉकडाऊनमध्ये वर्भर शाळा बंद असल्याने १५ प्रशिक्षण कार्यशाळा होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे बोर्डाने प्रशिक्षण शुल्काचे १०० कोटी रुपयेदेखील परत करण्याची शिक्षकांची मागणी आहे.
- सीबीएसईच्या देश-विदेशातील शाळा - २२,०००
- विद्यार्थी संख्या - १८ लाख ८९ हजार ८७८
- भरलेले परीक्षा शुल्क - ३४९ कोटी ६२ लाख ७४ हजार ३०० रुपये
- सात लाख शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी भरलेली रक्कम - सुमारे १०० कोटी रुपये