सांगली/तासगाव/शिराळा : शिराळा तालुक्याला आज (शुक्रवार) सलग आठव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला आहे. चांदोली धरणामध्ये आजही अतिवृष्टी झाली असून १३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात १६.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वारणा, कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे तेथील पाणीसाठ्यात वाढत होत आहे. कृष्णा, वारणा नदींच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. कोकरूड, आरळा, चरण, मांगले, चांदोली धरण परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली, तर इतर ठिकाणी लहान-मोठ्या पावसाच्या सरी पडत होत्या. चांदोली धरण परिसरात १३८ मि.मी. पावसाची नोंद झाली. ३४ टी. एम. सी.च्या धरणामध्ये १६.२७ टीएमसी पाणीसाठा झाला. हे धरण ४७.८५ टक्के भरले. गेल्या चोवीस तासात १.२७ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तालुक्यातील ४९ तलाव मात्र अद्याप कोरडेच आहेत. वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात कोयना धरणक्षेत्रात १७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वाळवा, शिराळा तालुक्यातही शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्यामुळे वारणा, आणि कृष्णा नदींची पाणीपातळी वाढली आहे. मिरज, सांगली शहरातही दिवसभर रिमझिम पाऊस सुरुच होता. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात दलदल झाली आहे. गुंठेवारी क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था खूपच खराब झाली आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात शुक्रवारी पावसाचा चांगला जोर होता. दिवसभर पावसाच्या मोठ्या सरी येत असल्यामुळे खरीप पिकांना त्याचा चांगला फायदा आहे. (प्रतिनिधी)
चांदोलीत पुन्हा अतिवृष्टी
By admin | Published: July 18, 2014 11:54 PM