चंद्रकांत गुडेवार-सदस्यांची खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:20+5:302021-03-25T04:25:20+5:30
सांगली : भिलवडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायत बरखास्त प्रकरण व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवारांवरील शिस्तभंगाच्या कारवाईच्या ...
सांगली : भिलवडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायत बरखास्त प्रकरण व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवारांवरील शिस्तभंगाच्या कारवाईच्या मागणीवरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. सदस्य सुरेंद्र वाळवेकर व गुडेवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी गुडेवारांकडून वाळवेकरांचा अवमान झाल्याने सर्व सदस्य संतापले. तासभराच्या गोंधळानंतर गुडेवार यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला.
जिल्हा परिषदेत अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. ग्रामसेवकांचा मनमानी कारभार आणि त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांचे अभय यावरून सदस्यांनी सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जतमध्ये तर ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी घरकुलाच्या लाभार्थींकडे पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप महादेव दुधाळ यांनी केला.
मागील सभेत गुडेवार यांच्याविरोधात सूचित केलेल्या शिस्तभंगाच्या प्रस्तावाचे काय झाले, असा प्रश्न सदस्य अर्जुन पाटील यांनी उपस्थित केला. यावर अध्यक्षा कोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. यावर डुडी यांनी स्पष्टीकरण दिले की, याविषयी चौकशी केली असता कोणतीही अनियमितता आढळली नाही, आपल्याला तसे पुरावे कोणीही दिलेले नाहीत.
त्यानंतर लगेच सुरेंद्र वाळवेकर यांनी भिलवडी ग्रामपंचायतीवर फौजदारी करण्यास निघालेल्या गुडेवार यांना सहा महिन्यांनंतर काहीच गैरप्रकार झाला नसल्याचा साक्षात्कार कसा झाला, असा सवाल केला. यावरून ही कारवाई एकतर्फी होती हे सिद्ध होत असून गुडेवार यांची बोलती बंद झाली आहे, अशी टीका वाळवेकरांनी केली. यामुळे गुडेवार चिडले त्यांनी, ‘तुम्ही मला शिकवू नये’, असे वाळवेकर यांना सुनावले. सर्व सदस्यांनी गोंधळ केला. समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आक्रमक होत ‘हा अवमान आम्ही सहन करणार नाही, गुडेवार यांनी माफी मागावी, अन्यथा सभागृह चालू देणार नाही’ अशी भूमिका घेतली. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी ‘सदस्यांना दाब देता काय’, असे म्हणत सुनावले. ब्रह्मानंद पडळकर, जितेंद्र पाटील, सरदार पाटील, अरुण बालटे, स्नेहलता जाधव, विशाल चौगुले, संजय पाटील यांच्यासह सर्वांनी ‘माफी मागत नसतील तर गुडेवार यांना बाहेर काढा’ असे म्हणत कामकाज बंद पाडले. सरदार पाटील यांनी गुडेवार यांच्याविरोधात एका कंत्राटदाराचे पत्र वाचून दाखविले. मनमानीबद्दल गुडेवारांची बदली करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
तम्मणगौडा रवी-पाटील यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सदस्य खवळले. काहीवेळ पाटील व इतर सदस्यांत वादावादी झाली. अखेर गुडेवार यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला.
चौकट
कोणाच्या मदतीसाठी हे केले?
माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, भिलवडी प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, अशी क्लीन चिट गुडेवारच देतात. यावरून निवडणूक काळात कोणाच्या मदतीसाठी त्यांनी हे केले आहे, हे आता स्पष्ट होते.