कामगार विमा मंडळ रुग्णालयात अनागोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 02:10 PM2020-01-11T14:10:22+5:302020-01-11T14:11:45+5:30
कामगारांना चांगले वैद्यकीय उपचार मिळत नसतील, तर कामगार विमा मंडळाची वर्गणी देणार नाही, असा इशारा उद्योजकांनी दिला. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या कार्यालयात उद्योजक, कामगार प्रतिनिधी व मंडळाचे प्रभारी दुर्गेश कोळी यांची बैठक झाली. यावेळी अधिकाऱ्यांना उद्योजकांच्या संतापाचा सामना करावा लागला.
सांगली : कामगारांना चांगले वैद्यकीय उपचार मिळत नसतील, तर कामगार विमा मंडळाची वर्गणी देणार नाही, असा इशारा उद्योजकांनी दिला. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या कार्यालयात उद्योजक, कामगार प्रतिनिधी व मंडळाचे प्रभारी दुर्गेश कोळी यांची बैठक झाली. यावेळी अधिकाऱ्यांना उद्योजकांच्या संतापाचा सामना करावा लागला.
मंडळाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सहायक कामगार आयुक्त असतात. त्यांनी प्रत्येक महिन्याला बैठक घेणे आवश्यक असते. पण जिल्ह्यात समितीची स्थापनाच झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव उद्योजकांनी मांडले. काही उद्योजकांची मंडळावर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर, त्यांनी बैठक घेणे भाग पाडले.
त्यांनी सांगितले की, मंडळाच्या रुग्णालयात चांगले उपचार व औषधे मिळत नाहीत. सांगली-मिरजेसाठी फक्त दोन डॉक्टर आहेत. त्यांच्याही वेळा निश्चित नाहीत. मिरजेतील मिशन, भारती, सिद्धिविनायक कर्करोग या मोठ्या रुग्णालयांना मंडळाची मान्यता नसल्याने कामगारांना प्रचंड त्रास होतो. जिल्ह्यात फक्त तीन रुग्णालयांत सोय आहे.
उद्योजकांनी बैठकीतूनच मंडळाचे राज्य संचालक प्रणय सिन्हा व उपसंचालक दत्ता कांबळे यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील रुग्णालयांच्या परिस्थितीत पंधरा दिवसात सुधारणा न झाल्यास वर्गणी बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. २१ जानेवारीच्या पुढील बैठकीला या दोघांनी उपस्थित राहण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅली चेंबरचे रमेश आरवाडे, कामगार प्रतिनिधी तानाजी पाटील, अजित सूर्यवंशी, गणेश पाटील, जयंत पाटील, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.