सांगली : दिल्ली रेल्वे स्थानकातील ४३ कोटी रुपयांच्या ८३.६२१ किलो वजनाच्या सोने तस्करीप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थांनी ११ संशयितांवर आरोपपत्र दाखल केले आहे, पैकी १० संशयित सांगलीचे, तर एकजण सोलापूर जिल्ह्यातील आहे.
त्यांची नावे अशी : रवीकिरण बाळासाहेब गायकवाड, पवनकुमार मोहन गायकवाड, सचिन आप्पासाहेब हसबे, योगेश हणमंत रुपनर, अभिजित नंदकुमार बाबर, अवधूत अरुण विभूते, दिलीप लक्ष्मण पाटील, समाधान शिवाजी जगताप, अक्षय रामचंद्र जाधव आणि विशाल महादेव शिंदे (सर्व रा. सांगली जिल्हा), सद्दाम रमजान पटेल (सोलापूर).
दिल्ली रेल्वे स्थानकावर १६ सप्टेंबर २०२० रोजी ८३.६२१ किलो वजनाच्या ५०४ सोन्याच्या विटा पकडल्या होत्या. या तस्करीप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपास संस्थांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेल्वे स्थानकावर ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. झाडाझडतीमध्ये त्यांच्याकडे सोन्याच्या विटा सापडल्या. त्यांची किंमत तत्कालीन बाजारभावानुसार ४३ कोटी रुपये होती. या सोन्याविषयी कायदेशीर कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत, त्यामुळे तपासाधिकाऱ्यांनी सोने जप्त केले. तपासाअंती ते तस्करीचे असल्याचे निष्पन्न झाले.
गेले नऊ महिने तस्करीचा तपास सुरू होता. चोरट्या सोन्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत येऊन पोहोचले, त्यानुसार एनआयएच्या पथकांनी काहीवेळा सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेही मारले. संशयितांच्या घरात शोध मोहीम राबविली. त्यानंतर आरोपपत्र तयार केले. दिल्ली न्यायालयात नुकतेच ते दाखल केले असून आता नियमित सुनावणी चालेल.
हे सर्व संशयित सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटचा एक भाग असल्याचा ठपका ‘एनआयए’ने ठेवला आहे. त्यांनी कट रचून सोन्याची तस्करी केली. परदेशातून भारतात तस्करीच्या मार्गाने सोने आणण्यात सहभागी झाले, असा आरोप ठेवला आहे. परदेशातून हवाईमार्गे सोने गुवाहाटीमध्ये आणले गेले, तेथून दिल्लीमध्ये विविध तस्करांना देण्यात येणार होते. रेल्वेने दिल्लीत घेऊन आल्यानंतर शहरात शिरण्यापूर्वीच ‘एनआयए’ने त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरोधात पुरावा नष्ट करणे, बनावट दस्ताऐवज बनविणे असे आरोप ठेवले आहेत.
चौकट
तिघे फरारी, आठजण कारागृहात
गुन्ह्यातील तिघे संशयित अद्याप फरारी आहेत, उर्वरित आठजण कारागृहात आहेत. दहा संशयित सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यांतील आहेत, तर सद्दाम पटेल सोलापूर जिल्ह्यातील आहे.