स्वातंत्र्यसैनिकांचा चरित्रकोश तयार होणार!, शिवाजी विद्यापीठ करणार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:29 AM2022-05-02T11:29:58+5:302022-05-02T11:30:10+5:30
सहदेव खोत पुनवत : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत व विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांच्या इतिहास विभागामार्फत कोल्हापूर , सांगली , ...
सहदेव खोत
पुनवत : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत व विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांच्या इतिहास विभागामार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा चरित्रकोश तयार केला जात आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२२ रोजी चरीत्रकोषाच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर विविध कार्यक्रमांनी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.याच पार्श्वभूमीवर देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आणि हे स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांचे खरेखुरे योगदान आहे अशा दुर्लक्षित व अप्रकाशित स्वातंत्र्य सैनिकांची नोंद इतिहास विभाग घेणार आहे.
दरम्यान ही माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून यासाठी कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्याला प्रत्येकी एक समन्वयक निवडला गेला आहे.हे समन्वयक त्या-त्या जिल्ह्यातली स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संबंधित महाविद्यालयांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्याकडून संकलित करणार आहेत.
संबंधित स्वतंत्र्य सैनिकांचे फोटो अथवा हयात असल्यास त्यांच्या मुलाखती किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाखती सुद्धा संकलित केल्या जाणार आहेत. सांगली-कोल्हापूर-साताऱ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यादी आहे परंतु अपवाद वगळता त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील काम विस्तृतपणे कुठेही लिखित स्वरूपात नाही.यानिमित्ताने एका अर्थाने अनेक अप्रकाशित स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.
दरम्यान बी.ए.भाग तीनच्या पेपर क्रमांक-१६ साठी १० गुणांस आपल्या परिसरातील स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोषासाठी माहिती संकलनाचा प्रकल्प दिला जाणार आहे.यामुळे विद्यापीठाच्या या महात्वकांक्षी प्रकल्पाच्या पुर्ततेत विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग राहणार आहे.यामुळेच सर्वांच्या प्रयत्नातून इतिहासाचा अमुल्यठेवा पुढे येणार आहे.
कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर चरीत्र कोषाव्दारे प्रकाश टाकला जाणार आहे.आपल्या जवळच्या महाविद्यालयातील इतिहास विभाग सदरची माहीती संकलीत करणार आहे.माहिती असणाऱ्या अथवा याकामी रुची असणाऱ्यांनी जवळच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. - डॉ.भारतभुषण माळी, सांगली जिल्हा समन्वयक व इतिहास विभागप्रमुख,वाळवा