महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कागवाड चेक पोस्टवर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:39+5:302021-02-23T04:40:39+5:30
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कर्नाटक सरकारने म्हैसाळ सीमेवर कागवाड येथे पुन्हा चेकपोस्ट उभारले आहे. ...
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कर्नाटक सरकारने म्हैसाळ सीमेवर कागवाड येथे पुन्हा चेकपोस्ट उभारले आहे. येथे कोरोना चाचणी व नियमांच्या पालनाबाबत सूचना देण्यात येत आहेत. कर्नाटक पोलीस व आरोग्य विभागामार्फत वाहनधारकांची तपासणी करण्यात येत आहे. मिरजमार्गे कर्नाटकात जाणाऱ्या सर्व प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करून कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या व ज्यांनी कोरोना चाचणी केलेली नाही अशा प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. चिंचली यात्रेला प्रतिबंध असल्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना कागवाड सीमेवरच थांबविण्यासाठी कागवाड येथे पोलीस व प्रशासनाची तयारी सुरू आहे. मिरजमार्गे दरारोज हजारो वाहने कर्नाटकात ये-जा करतात. मात्र, येत्या काही दिवसांत कर्नाटकात येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध लागू होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यापूर्वी लाॅकडाऊननंतर चार महिन्यांपूर्वी कागवाड सीमेवरील चेक पोस्ट हटविण्यात आले होते.