अभ्यासाच्या नावाखाली मुलांचे नको ते उद्योग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:29+5:302021-05-16T04:24:29+5:30

गेल्या दीड वर्षापासून अपवाद वगळता शाळा पूर्ण बंद आहेत. त्यामुळे घरकोंबडा झालेल्या मुलांना मोबाइलच सर्वात जवळचा मित्र वाटू लागला ...

Children's unwanted industry in the name of study! | अभ्यासाच्या नावाखाली मुलांचे नको ते उद्योग!

अभ्यासाच्या नावाखाली मुलांचे नको ते उद्योग!

Next

गेल्या दीड वर्षापासून अपवाद वगळता शाळा पूर्ण बंद आहेत. त्यामुळे घरकोंबडा झालेल्या मुलांना मोबाइलच सर्वात जवळचा मित्र वाटू लागला आहे. ऑनलाइन क्लास आणि शाळांमुळे पालकही मुलांच्या हाती मोबाइल सोपवत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये मुलांसाठी वेगळा स्मार्टफोनही घेण्यात आला आहे. मुळात स्मार्टफोनची ओळखच दुधारी तलवार अशी केली जाते. त्याचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही असल्याने मुलांच्या सवयी, घरातील ज्येष्ठांशी, शेजाऱ्यांशी वागणे, बोलणे पूर्ण बदलले आहे. पालक आणि मुलांमधील सुसंवाद कायम राहावा यासाठी काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांकडे याच तक्रारी वाढत आहेत.

सायबरकडे प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला तर लॉकडाऊन असतानाही अनेक तक्रारी येत असल्याचे समोर आले आहे. त्यातही पालकांच्या सोशल मीडिया अकांऊटवरून अयोग्य संदेश पाठविणे, फोटो पाठविणे असले प्रकार समोर आले आहेत. सोशल मीडियावर एखादी ‘थ्रीलर’ कथा पाहून तसेच घरातही करण्याचे प्रकार वाढले आहेत. असा नको तो प्रकार घडल्यानंतर याबाबत तक्रार केली जाते, मात्र, घरातीलच मुलांकडून असा प्रकार घडल्याचे समोर आल्यानंतर पालकही अस्वस्थ होत आहेत.

ज्या वयात केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे अशा पौगंडावस्थेत रात्र रात्र जागून मुले गेमची ‘लेवल’ पूर्ण करत आहेत किंवा संकेतस्थळावर अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे समोर आल्याने मुलांचा ‘बुक टाइम’ऐवजी ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने पालकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

चौकट

‘मोबाइल ॲडिक्शन’ घातकच

मानसोपचारतज्ज्ञ पूनम गायकवाड यांनी सांगितले की, वर्षभरात अशा अनेक केसेस येत आहेत. मुलांशी खेळायला कोणी नसल्याने आहे त्या वस्तूमध्येच ते आपला विरंगुळा शोधू लागतात आणि त्याची पुन्हा सवय हाेऊन जाते. यातून मुलांची चिडचिड, आक्रमकपणा वाढतो. त्यामुळे त्यांची ही मोबाइलची सवय एकदम बंद केल्यास ते अजून बैचेन होतात. त्यामुळे हळूहळू ही सवय कमी करायला हवी. पालकांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास अजाणत्या वयात मुलांकडून चुका घडू शकतात.

- शरद जाधव

Web Title: Children's unwanted industry in the name of study!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.