भिवर्गीतील चौगुले कुटुंबीय कोरोनाविरूद्धच्या लढाईत अग्रस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:46+5:302021-05-29T04:20:46+5:30
संख : भिवर्गी (ता. जत) येथील मल्लेशप्पा चौगुले या शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्य जीवाची पर्वा न करता, कोरोना विरोधातील लढाईत ...
संख : भिवर्गी (ता. जत) येथील मल्लेशप्पा चौगुले या शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्य जीवाची पर्वा न करता, कोरोना विरोधातील लढाईत योद्ध्यासारखे लढत आहेत. या कुटुंबातील तिघेजण शासकीय सेवेत असून, अखंडित दीड वर्ष कोरोनाविरुद्धच्या लढाईत झोकून देऊन काम करत आहेत.
पूर्व भागातील भिवर्गी हे सीमावर्ती कन्नडबहुल गाव आहे. मल्लेशप्पा मलकप्पा चौगुले हे कर्नाटकातील हुबनूर येथील जिल्हा परिषद शाळेत वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबातील तिघेजण पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना लढाईत कर्तव्य बजावत आहेत. आरोग्य विभागात प्रकाश मल्लेशप्पा चौगुले, भाग्यश्री प्रकाश चौगुले हे सेवा बजावत आहेत तर वैशाली रमेश चौगुले या सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कोरोना महामारीत रस्त्यावर उतरुन कामगिरी बजावत आहेत.
प्रकाश चौगुले हे सोलापूर येथील राज्य विमा योजना रुग्णालयात अधिपरिचारक म्हणून ४ वर्षांपासून सेवेत आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत प्रभावीपणे कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या पत्नी भाग्यश्री प्रकाश चौगुले या नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून साडेतीन वर्षांपासून सेवेत असून, कोरोनाबाधित रुग्णांंवर देखभाल, उपचार करत आहेत. गेल्यावर्षी हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे त्यांनी कोरोना ड्युटी केली आहे. त्यांंना दीड वर्षाचा अर्णव हा मुलगा आहे. मुलाला घरी ठेवून कोरोना महामारीच्या संकटात त्या आपलं कर्तव्य बजावत आहेत.
प्रकाश चौगुले यांच्या भावजय वैशाली रमेश चौगुले या सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ६ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना एका वर्षाचा अक्षय हा मुलगा आहे. त्याला घरी ठेवून कोरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरुन कर्तव्य बजावत आहेत. वैैशाली यांचे पती रमेश चौगुले हे कोरोना काळात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच बाधित रुग्णांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोना तपासण्या, लसीकरण याबाबत जनजागृती करत आहेत.
चौगुले कुटुंब कोरोना काळातही आपापल्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत सेवा बजावत आहे.