एकेकाळी सांगली-मिरज रस्त्यावर मीटरगेज रेल्वे धावत होती. या रेल्वेला विश्रामबाग, वानलेसवाडी, मिरज असे थांबे होते. रेल्वेचे तीन नंबरचे गेट पुष्पराज चौकात होते. या परिसरात घरेही फारशी नव्हती. पुष्पराज चौकात रामचंद्रे यांची जागा भाड्याने घेऊन पुष्पराज हॉटेल सुरू झाले. त्यामुळे १९६५ ते ७० च्या दरम्यान वाटसरूंसाठी चहा-पाण्याची सोय झाली. कालांतराने सांगली-मिरज रेल्वेसेवा बंद झाली. पण पुष्पराज हॉटेल तसेच राहिले. या चौकात नागरिकांना ओळख सांगण्यासारखे कोणतेही ठिकाण नव्हते. यामुळे नागरिक ‘पुष्पराज हॉटेल चौक’ असे म्हणत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष १९८७-८८ मध्ये होते. त्याचे औचित्य साधून नगरपालिकेने १९८८ मध्ये चौकात कर्मवीरांचा पुतळा बसविला. गॅझेट करून ‘कर्मवीर चौक’ असे नामकरणही करण्यात आले. आता अनेक मोठी आंदोलने आणि मोर्चाची सुरुवात येथूनच होते. अनेक मोठ्या सभाही या चौकात झाल्या आहेत.
- अशोक डोंबाळे