शहरी बस भर रस्त्यातच पडली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:53+5:302021-02-13T04:24:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन राज्य शासन करीत असताना, शहरी बस मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन राज्य शासन करीत असताना, शहरी बस मात्र प्रवाशांची डोकेदुखी ठरू लागली आहे. त्याचा अनुभव शुक्रवारी प्रवाशांना आला. सांगली बसस्थानकातून यशवंतनगरकडे जाणारी बस काँग्रेस भवनजवळील चौकात अचानक बंद पडली. ही बस सुरू होणार नाही, असे वाहक, चालकांकडून सांगण्यात आले. प्रवाशांना दुसऱ्या बसचा पर्यायही लवकर उपलब्ध करून दिला नाही. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू होता.
सांगली बसस्थानकातून सकाळी सव्वादहा वाजता यशवंतनगरला जाणारी बस आहे. बसस्थानकातून ही बस पावणेअकराच्या सुमारास सुटली. या बसमध्ये महिला, विद्यार्थीही होते. आधीच अर्धा तास बस उशिरा सुटल्याने प्रवासी वैतागले होते. मजल-दरमजल करीत ही बस काँग्रेस भवनजवळील बसथांब्यावर आली. तेथून थोड्या अंतरावर जाताच ती बंद पडली. चालकाने बऱ्यापैकी प्रयत्न केले. पण बस सुरू होत नसल्याचे पाहून त्याने नियंत्रण कक्षाला कळविले. दरम्यान, प्रवाशांनी दुसरी बस मागविण्याची विनंतीही केली. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काही प्रवाशांनी नियंत्रण कक्षालाही दूरध्वनी केला. पण दूरध्वनीच उचलला गेला नाही. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू होता. काही प्रवाशांनी शहरी बसचा नाद सोडून वडापने मार्गक्रमण केले. महिला प्रवाशांनी वाहक, चालकांकडे संताप व्यक्त केला. अखेर तासभरानंतर दुसरी बस पाठविण्यात आली. महामंडळाच्या या कारभाराबद्दल प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
कोट
बसस्थानकातूनच आधी उशिरा बस सोडली गेली. त्यानंतर काँग्रेस भवनजवळ ती बंद पडली. आम्ही नियंत्रण कक्षाशी संपर्क केला. पण कुणीच दूरध्वनी उचलला नाही. जवळपास तासभर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
- सीमा पाटील, प्रवासी