शहरात व्यापाऱ्यांनी थाटली रस्त्यावरच दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:06+5:302021-01-04T04:23:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. अतिक्रमण करण्याची सवय लागलेल्या दुकानदारांनी आता ...

In the city, traders set up shops on the streets | शहरात व्यापाऱ्यांनी थाटली रस्त्यावरच दुकाने

शहरात व्यापाऱ्यांनी थाटली रस्त्यावरच दुकाने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. अतिक्रमण करण्याची सवय लागलेल्या दुकानदारांनी आता मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत. पण त्यांच्यावर कारवाईचे धारिष्ट अजूनही महापालिकेने दाखविलेले नाही. केवळ दोन दिवसांसाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोहिमेची नौटंकी संपताच पुन्हा दुकानदारांनी रस्त्यावर माल आणला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

मुख्य बाजारपेठेतील मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठ, सराफ कट्टा, मेन रोड हे रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. दुकानासमोर फळ व किरकोळ विक्रेत्यांनी आधीच अतिक्रमण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाला. पण सतत राजकीय हस्तक्षेप झाल्याने त्याला यश आले नाही. आता त्यात दुकानदारांची नव्याने भर पडली आहे. मारुती रोडवर तर दुकान कुठले आणि अतिक्रमण कोणते याचाच थांगपत्ता लागत नाही.

दोन-तीन मजली दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरच माल आणला आहे. दुकानात माल कमी आणि रस्त्यावर अधिक अशी स्थिती झाली आहे. स्वत:चा गाळा, दुकान असतानाही व्यापारी रस्त्यावरच उभा राहून माल विकत आहे. त्यात एखादे दुकान बंद पडले असेल तर त्याच्यासमोर नवीनच विक्रेता जागा बळकावितो. टेबल लावून तोही व्यवसाय सुरू करतो. काॅस्मेटिक, कापडापासून ते अगदी कुलर, खुर्च्यांपर्यंत साऱ्या वस्तू रस्त्यावर मांडल्या जात आहेत. मारुती रोड तर केवळ वीस फुटांपेक्षाही कमीच उरला आहे. त्यात हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण वेगळेच. हीच अवस्था हरभट रोड, कापड पेठेचीही झाली आहे. चारचाकी वाहन या रस्त्यावर जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.

चौकट

महापालिकेची नौटंकी

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिकेने दिवाळीपूर्वी हाती घेतली होती. नव्याने रुजू झालेले उपायुक्त राहुल रोकडे हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. पण मोहीम थांबताच पुन्हा दुकानदारांना अतिक्रमण करून रस्ता व्यापला आहे. महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहिमेची नौटंकी वाहनधारकांना मात्र त्रासदायक ठरत आहे.

Web Title: In the city, traders set up shops on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.