अविनाश बाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी
: नमस्कार, मी साहेबू सोमा लोखंडे (वय ७०, रा. राजेवाडी) चाळीस वर्षांपूर्वी माज्या पोरावर एकानं खोटा आळ घातला. मी घाबरून गेलो, पण पोलिसांनी त्यावेळी खरं काम केलं. तवापासून मी मला जमेल तेव्हा येतो आणि पाेलीस स्टेशन स्वच्छ करतो ! पोलिसांच्या प्रामाणिक कारवाईचं इमान राखत हा वृद्ध चक्क चाळीस वर्ष इनाम देतोय... हे पाहून पोलीसच काय नागरिकही या आजोबांचं कौतुक करतात.
पोलिसांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या अनुभवाबद्दल नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. त्यामध्ये पोलिसांवर आरोप करणाऱ्यांचीच संख्या मोठी असते, पण राजेवाडी येथील साहेबू लाेखंडे आजाेबांचा अनुभव वेगळा आहे. साहेबू यांना दोन मुलं.. त्यापैकी एकावर शेतातील विहिरीवर असलेल्या मोटारींच्या केबल चोरून नेल्याचा आरोप एकाने केला. पोलिसांनी निरोप देताच आजोबा घाबरले. मुलाला घेऊन आटपाडीला आले. पोलिसांसमोर हात जोडले. ‘साहेब खरी माहिती घ्या’, अशी विनंती केली. तेव्हा पोलिसांच्या चाैकशीत या आजोबांचा मुलगा दोषी नसल्याचे निष्पन झाले. पोलिसांनी पाेराला सोडून दिले.
आजोबांना कोण आनंद झाला.
आटपाडी पोलीस ठाण्याशेजारी दत्त मंदिर आहे. तेव्हाही परिसर सगळा अस्वच्छ होता. आजाेबांनी झाडू हाती घेतला आणि मंदिरासह पोलीस ठाण्याचा सगळा आवार झाडून स्वच्छ केला. तेव्हापासून आजपर्यंत ते जमेल तेव्हा येऊन हा परिसर स्वच्छ करीत आहेत.
चौकट
खऱ्याला न्याय मिळतो!
आजोबांचा पोलिसांचा अनुभव खूपच चांगला आहे. त्यांचं म्हणणं असं की, इथे न्याय होतो. ड्यूटीवर असलेले पोलीसही या आजोबांना चहा-पाणी देतात. परिसर स्वच्छ केल्यावर आजोबा कसलीही अपेक्षा न ठेवता सुमारे २२ किलाेमीटरवरील आपल्या गावी राजेवाडीला निघून जातात. त्यांच्या अडीच एकर शेतात ऊस आहे. मुलं त्यांचा चांगला सांभाळ करतात. दारात दुभती जनावरेही आहेत.
कोट
चाळीस वर्षांपूर्वी पोलीस खूप मारायचे, पण माझ्या मुलाला पोलिसांनी हात लावला नाही. खोटा आरोप होता. पाेलिसांनी चौकशी करून न्याय दिला. मी मरेपर्यंत इथे येऊन स्वच्छता करणार.
- साहेबू सोमा लोखंडे (राजेवाडी)