दादा खोत - सलगरे कलिंगडाचे दर सध्या गडगडले आहेत. वर्षभरात रमजान महिना कलिंगडाच्या बाजारासाठी महत्त्वाचा मानला जातो. परंतु उच्चांकी भाव मिळणाऱ्या कलिंगडाला यंदा रमजाननेही साथ दिली नाही. मंदावलेले दर अद्याप वधारले नसल्याने मिरज पूर्व भागातील कलिंगड उत्पादक घाट्यात आले आहेत. पूर्वी कलिंगडाचे उत्पादन हंगामी स्वरूपात घेतले जायचे. परंतु मेट्रो शहरांमधील बारमाही मागणी लक्षात घेता शेतकरी वर्षभर पीक घेऊ लागले आहेत. मिरज पूर्व भागात पाणी आल्याने कलिंगडाचे उत्पादन वाढले आहे. आॅक्टोबर ‘हिट’, उन्हाळ्याचे चार महिने, रमजान असा कालावधी कलिंगडाला चांगला भाव मिळवून देणारा कालावधी आहे. मात्र मागील आठ, दहा महिन्यांपासून कलिंगडाचे मुंबई बाजारामधील दर सरासरी आठ ते नऊ रुपये किलो इतकेच होते. त्यामुळे उत्पादकांना वाहतूक व इतर खर्च वगळून पाच रुपये किलोपर्यंतचाच भाव मिळत होता. हा दर सरासरी १३ ते १४ रुपये असेल तरच कलिंगडाचे पीक परवडते. कारण कलिंगडाचा एकरी उत्पादन खर्च लाख रुपयाच्या घरात जातो. रमजान महिन्यात मुंबईची बाजारपेठ कलिंगडासाठी ‘लकी’ मानली जाते. या महिन्यात कलिंगडाचा दर १५ ते १८ रुपयांपर्यंत असतो. मात्र यावेळी रमजानमध्येही हा दर सरासरी सात ते नऊ रुपये किलो इतकाच मिळत आहे. वर्षभरातील मंदावलेले दर रमजानमध्ये वधारून खर्चाचा समतोल या दराने भरून निघेल, अशी आशा उत्पादकांना होती; मात्र या आशेवरही पाणी पडले आहे. पडलेले दर सात रुपयांवरून अद्याप उठायला तयार नाहीत. त्यातच मान्सून सरींनाही सुरुवात झाल्याने उत्पादकांना मिळेल त्या दराने कलिंगडांची विक्री करणे भाग पडत आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही मागील वर्षभरात दर कमी असूनही केवळ रमजान महिन्यात चांगला दर मिळेल, या आशेने कलिंगडाच्या दोन महिन्यात लागवडी केल्या होत्या; पण सरासरी सात रुपये किलो असा दर मिळाल्याने उत्पादन खर्चाशी ताळमेळ घालणे मुश्कील होऊन बसले आहे, अशी प्रतिक्रिया कलिंगड उत्पादक उमेश होनराव यांनी व्यक्त केली.
दर घटल्याने कलिंगड उत्पादक हादरले
By admin | Published: July 18, 2014 11:54 PM