सांगली : जिल्ह्यातील हवामानात पुन्हा बदल झाला असून, पावसानंतर आता सर्वत्र थंडीची लाट आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरासरीपेक्षा कमाल तापमान ४ ते ६ अंशाची घट झाली आहे. त्यामुळे रात्रीसह दिवसाही थंडी जाणवू लागली आहे.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेली दहा दिवस सामान्य असणारे कमाल तापमान आता सरासरीच्या खाली आले आहे. शुक्रवारी ते २७ अंशापर्यंत, तर शनिवारी ३० अंशापर्यंत खाली आले. सध्या कमाल तापमान फेब्रुवारीच्या सरासरीच्या तुलनेत ४ अंशाने कमी आहे. त्यामुळे दिवसाही नागरिकांना थंडी जाणवत आहे. जिल्ह्याचे किमान तापमान शनिवारी १७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान जवळपास सरासरीइतके आहे. त्यामुळे रात्रीची थंडी कायम आहे. आठवडाभर किमान तापमान १७ ते १८ अंशाच्या घरात राहणार आहे. त्यामुळे रात्रीची थंडी कायम राहणार आहे. दुसरीकडे कमाल तापमान ४ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने दिवसाची थंडी कमी होईल.
शनिवारी सायंकाळी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अंशत: ढगाळ वातावरण होते. रविवारपासून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. अचानक पाऊस, धुके, थंडी व सामान्य तापमान अशा लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढत आहेत.