सांगली : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर आपण अनुभवला आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी रूग्णसंख्या वाढल्याने खाटाही कमी पडल्या होत्या. उपचारासाठी रुग्णालयेही कमी पडली होती. ही परिस्थिती लक्षात घेता, आता प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे व गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बाजारात जाणे टाळा, कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्वांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.