आयुक्तांनी मुलांसाठी शाळाच बदलली; काय केले त्यांनी नेमके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:38 PM2020-02-28T22:38:32+5:302020-02-28T22:39:16+5:30
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला.
सांगली : पापुद्रे निघालेल्या रंगहीन भिंती, कोपऱ्यांना गेलेले तडे, जळमटलेले वर्ग, नीरस वातावरण, असे निराशादायी चित्र महापालिकेच्या अनेक शाळांत बघायला मिळते. पण आता ते बदलण्याचा निर्धार करीत आयुक्त नितीन कापडणीस यांनी सह्याद्रीनगर येथील शाळा क्रमांक २३ चे रूपडेच पालटले आहे. त्यांच्या कल्पकतेने ही शाळा बोलकी केली असून शाळेत सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू होणार आहेत.
महापालिकेच्या अनेक शाळा बदलत्या परिस्थितीत पटसंख्या टिकविण्यासाठी धडपडू लागल्या आहेत. एकूण ५० शाळा असून पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयुक्त कापडणीस यांनी पदभार हाती घेतल्यानंतर शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी सह्याद्रीनगर येथील विष्णुअण्णा बालमंदिर या शाळा क्रमांक २३ ची निवड करण्यात आली.
आज शाळेचे रूपडे बदलून गेले आहे. भिंती, छतावर चित्रे रेखाटली आहेत. प्रशस्त मैदान, खेळणी, संगीत कलेसाठी स्वतंत्र व्यवस्था, आऊटडोअर व इनडोअर गेम्स या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शुध्द पिण्याचे पाणी, शंभर टक्के बेंच व्यवस्था, मुलांसाठी टॅब, डिजिटल क्लासरूम, नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रगणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगीत खोली अशा सुविधा दिल्या आहेत.
सेमी इंग्लिशचे वर्ग यंदापासून सुरू होणार
यंदापासून महापालिकेच्या १५ शाळांमध्ये सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षक सेवकांना गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुलांना मोफत गणवेश, पुस्तके दिली जातील. सेमी इंग्लिश शाळेत सुविधांसाठी दानशूर लोकांनीही पुढे यावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
महापालिकेच्या सह्याद्रीनगर येथील शाळेत सेमी इंग्लिश आणि डिजिटल वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना आव्हान देतील असे बदल शाळेमध्ये करण्यात आले आहेत.