सांगली : शिक्षक समितीच्या संचालक मंडळाने सभासद हिताचे घेतलेले निर्णय विरोधकांना पचनी पडलेले नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन सतत शिक्षक बँकेची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी शिक्षक संघाच्या संचालकांनी सुरूच ठेवला आहे. बँकेवर शिक्षक समितीचे पुरोगामी सेवा मंडळच हॅटट्रिक करेल, असा विश्वास अध्यक्ष सुनील गुरव यांनी व्यक्त केला.
गत पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक समितीने सत्तेवर येताच सभासदांच्या कायम ठेवी परत करणे, टप्प्याटप्प्याने कर्जाचे व्याजदर खाली आणणे, सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा, सेवानिवृतांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असे उपक्रम सातत्याने सुरूच ठेवले आहेत. शिवाय मृत संजीवनी ठेव योजनेच्या माध्यमातून मयत सभासदांच्या कुटुंबीयांना व संबंधित कर्जदाराच्या जामिनदारांना आर्थिक संकटातून मुक्त केले आहे. परंतु विरोधक सवंग लोकप्रियतेसाठी केविलवाणी धडपड आहे. त्यांची ही बाष्कळ बडबड सभासदच व्यर्थ ठरवतील, असेही ते म्हणाले.
यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, शशिकांत भागवत, सयाजीराव पाटील, बाबासाहेब लाड, दयानंद मोरे, माणिकराव पाटील, सतीश पाटील, उपाध्यक्ष महादेव माळी, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, यु. टी. जाधव, शिवाजी पवार, श्रेणिक चौगुले, राजाराम सावंत, अर्चना कोळेकर, बाळासाहेब अडके, सदाशिव पाटील, रमेश पाटील, हरिभाऊ गावडे, श्रीकांत माळी उपस्थित होते.