फोटो ओळी : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या शतकमहोत्सवी जयंती कार्यक्रमाच्या प्रारंभदिनी ऑनलाईन सभेत प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैभव नायकवडी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : आकाशाला गवसणी घालणाऱ्या नागनाथअण्णांचे बलस्थान हे सामान्य माणूस होते. हे महान व्यक्तिमत्त्व वाळव्यासारख्या भूमीत जन्मले, हे इथल्या जनतेचे भाग्यच होय, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी शुक्रवारी केले.
क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या शतकमहोत्सवी जयंती कार्यक्रमाचा प्रारंभ ऑनलाईन सभेने झाला. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. यावेळी प्रा. राजा माळगी, प्रा. आनंदराव शिंदे, मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे, मुख्याध्यापिका विद्या चेंडके, मधुकर वायदंडे, प्रा. एस. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.
बाळासाहेब नायकवडी म्हणाले, १३ तालुक्यांतील फाटक्या लोकांना संघटित करून नागनाथअण्णांनी दुष्काळी तालुक्यातील गावांना कृष्णा नदीचे पाणी मिळवून दिले.
वैभव नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णा हे एक व्यक्ती नसून विचार होते. त्यांनी सत्तेचे राजकारण करण्यापेक्षा गोरगरिबांचे समाजकारण करणे स्वीकारले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला नागनाथअण्णा हे काय रसायन होते हे समजावून देणे महत्त्वाचे आहे. प्रा. एस. आर. पाटील यांचे भाषण झाले. प्रा. राजा माळगी यांनी स्वागत केले. प्रा. के. बी. पाटील व श्रीधर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.