बेडगमध्ये आजपासून दहा दिवस पूर्ण टाळेबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:27 AM2021-04-20T04:27:03+5:302021-04-20T04:27:03+5:30
टाकळी : बेडग येथे कोरोनाबाधितांची संख्या १०१ वर गेली आहे. त्यामुळे मंगळवारपासून दहा दिवस कडक टाळेबंदीचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत ...
टाकळी : बेडग येथे कोरोनाबाधितांची संख्या १०१ वर गेली आहे. त्यामुळे मंगळवारपासून दहा दिवस कडक टाळेबंदीचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत झाला. चोरुन व्यवसाय करणाऱ्यांचे दुकान दहा दिवस सील करण्याचाही निर्णय झाला.
तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या उपस्थितीत सोमवारी ग्रामपंचायतीत बैठक झाली. उपसरपंच शरद ओमासे, पोलीस पाटील शारदा हांगे, जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर, माजी सभापती दिलीप बुरसे, अमरसिंह पाटील, संभाजी पाटील, उमेश पाटील, आरग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकुर्डेकर यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, गावातील सर्व डॉक्टर्स, व्यापारी व दक्षता समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. गावात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांत ती १०१ वर पोहोचली, त्यापैकी अनेक जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. चाचणी न करताच गावात फिरणाऱ्या संशयितांची संख्याही मोठी आहे.
ग्रामस्थांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचा निष्कर्ष बैठकीत निघाला, त्यामुळे मंगळवारपासून दहा दिवस कडक टाळेबंदीचा निर्णय झाला. या कालावधीत फक्त रुग्णालये व अैाषध दुकाने सुरु राहतील. भाजीपाला, किराणा, हॉटेल्स, बेकरी, सलूनसह अन्य सर्व व्यवसाय बंद ठेवले जाणार आहेत. एखादा व्यावसायिक चोरुन विक्री करताना आढळल्यास दुकान दहा दिवस सील केले जाणार आहे. तशी दवंडी सोमवारी दिवसभर देण्यात आली. कोरोनामुळे यात्रेचे सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत.