जिल्हा काँगे्रससमोर सक्षम नेतृत्वाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:39 AM2018-03-12T00:39:51+5:302018-03-12T00:39:51+5:30
सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच, पतंगरावांच्या निधनामुळे पक्षाला हादरा बसला आहे.
महापालिकेच्या २0१३ च्या निवडणुकीत पतंगराव कदम प्रथमच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या बहुतांश प्रभागात फिरले होते. उमेदवार असलेल्या आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी पाठबळ दिले होते. तिन्ही शहरातील नागरिकांनी पतंगरावांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसला एकहाती सत्ता सोपविली. तिकीट वाटपाची जबाबदारी मदन पाटील यांच्यावर सोपविली होती, तरी प्रचाराची संपूर्ण धुरा पतंगरावांनी सांभाळली होती. महापालिकेतील यशानंतर विधानसभेतही त्यांचे अभिनंदन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले होते.
महापालिकेची यंदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. त्याची तयारी आता सुरू झाली आहे. ही निवडणूकसुद्धा पतंगरावांच्या नेतृत्वाखालीच लढविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेत्यांनी केला होता. आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे, याचे अधिकारही पतंगरावांनाच दिले होते. अनेक इच्छुकांचीही सारी मदार पतंगरावांवर होती. एकीकडे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच पतंगरावांचे निधन झाले. ही घटना काँग्रेससाठी हादरा देणारी ठरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. मदन पाटील यांच्यानंतर केवळ पतंगरावच महापालिका क्षेत्रातील काँग्रेसला ताकद देऊ शकले असते. आता मदन पाटील यांच्यापाठोपाठ पतंगरावांचेही निधन झाल्याने नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षाच्या नियोजनातही विस्कळीतपणा येण्याची दाट शक्यता आहे. विरोधी पक्षांकडे ताकदीचे नेते असल्यामुळे सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसचे काय होणार, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
पक्षात दुसºया फळीतील नेत्यांकडे अनुभवाची कमतरता आहे. दुसºया फळीतील नेत्यांचीही मदार पतंगरावांवरच अधिक होती. त्यामुळे दुसºया फळीतील नेत्यांमध्येही हीच अस्वस्थता दिसून येत आहे. महापालिकेच्या इतिहासात, आजवर निवडणुकांचा काळ आला की पक्षांतर्गत मतभेद, रुसवा-फुगवीचा खेळ नेहमीच होतो. अशावेळी कार्यकर्त्यांना शांत करून खंबीरपणे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व कामी येत राहिले. आता तशी भूमिका बजावणारे नेतृत्व नाही. जे नेते आहेत, त्यांच्याकडे महापालिका निवडणुकीचा अनुभव फारसा नाही.
गटबाजीचे आव्हान
महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसला नेहमीच गटबाजीची चिंता सतावत राहिली. कडेगावला एका बैठकीत सर्व नगरसेवकांची पतंगरावांनी याच गटबाजीबद्दल कानउघाडणी केली होती. त्यानंतर महापालिकेतील चित्र काही काळ बदलले होते. पतंगरावांचा आदेश दोन्ही गटातील नगरसेवक मानत होते. आता हा समन्वय साधणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.