सांगली : लाड यांच्या कुटुंबात जशी चांगल्या राजकारणाची परंपरा आहे, तशीच परंपरा आम्हालाही लाभली आहे. लबाडी, विश्वासघात आमच्या रक्तात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी नेते आ. अरुण लाड यांनी आमच्याबाबत केलेली टीका चुकीची व वेदनादायी आहे, असे मत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पतसंस्था गटातून माझी व राष्ट्रवादीचे किरण लाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आम्ही एकत्रित प्रचार करीत आहोत. सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी प्रचारात सहभाग घेतला नाही, मात्र आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार केला आहे. त्यामुळे कुठेही आम्ही स्वार्थी प्रचार केला नाही. अरुण लाड यांनी आम्ही दगाफटका केल्याचा प्रकार सिद्ध करावा. याउलट आम्ही क्रॉस व्होटिंगचे प्रस्ताव उघडपणे फेटाळले आहेत.
जी. डी. बापू लाड यांच्या कुटुंबीयांबाबत आम्हाला आदर आहे. यापुढेही तो कायम राहील. अरुण लाड यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही त्यांना त्याच आदरभावाने मदत केली होती. जशी लाड यांच्या कुटुंबाला चांगल्या राजकारणाची, समाजकारणाची परंपरा आहे, तशीच परंपरा आमच्या कुटुंबाला लाभली आहे. आमचे वडील गुलाबराव पाटील यांनी जो विचार वारसा दिला त्याच वाटेवरून आम्ही जात आहोत. आजवर कधीही कोणाशी विश्वासघात आम्ही केलेला नाही. यापुढेही तसा प्रकार आमच्याकडून घडणार नाही. जिल्हा बँकेतील निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, उमेदवारांनी प्रामाणिकपणे प्रचार केला आहे. पतसंस्था गटातही असाच प्रामाणिक प्रचार झाला आहे. त्यामुळे लाड यांनी अकारण गैरसमज करू नये. निवडणूक निकाल लागल्यानंतर मी स्वत: त्यांना जाऊन भेटलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.