काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:46+5:302021-02-23T04:40:46+5:30

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीतही चुरस निर्माण झाली आहे. महापौरपद सांगलीला हवे, यासाठी ...

Congress-NCP candidature decided today | काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा आज फैसला

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा आज फैसला

Next

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीतही चुरस निर्माण झाली आहे. महापौरपद सांगलीला हवे, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर दबाव वाढला आहे. त्यातही काँग्रेसने महापौरपदावरील दावा कायम ठेवला असून, उत्तम साखळकर यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यात काँग्रेसचे नऊ नगरसेवकांनी दबाव गट तयार करून नेत्यांना कात्रीत पकडण्याची खेळी खेळली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. सोमवारी महापौरपदाचा उमेदवार निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ३४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपमधील नाराज गट फुटल्याने दोन्ही काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापौरपदावरून आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडून उत्तम साखळकर, तर राष्ट्रवादीकडून मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. आधी राष्ट्रवादीने भाजपच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवून बाजी मारली होती. तरीही काँग्रेसने महापौरपदावरील दावा कायम ठेवला आहे.

उत्तम साखळकर यांच्यासाठी काँग्रेस नेत्यांनीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे प्रयत्न चालविले आहेत. त्यात आता महापौर हा सांगलीचाच होणार असा दावाही केला जात आहे. त्यामुळे साखळकर व सूर्यवंशी यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मैनुद्दीन बागवान यांच्यासाठीही काहीजणांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे उमेदवारीचा तिढा रविवारीही सुटलेला नव्हता. सोमवारी रात्री आघाडीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

काँग्रेसच्या दबाव गटाचे काय?

कांँग्रेसमधील काही नगरसेवकांनी एकत्र येत दबावगट तयार केला आहे. त्यांच्यासोबत नऊ नगरसेवक असल्याचा दावाही केला जात आहे. या गटाकडून महापौरपद काँग्रेसकडेच हवे, अशी आग्रही मागणी केली जात आहे. तसेच महापालिकेच्या कारभारासाठी कोअर कमिटीची स्थापना करावी, अडीच वर्षात स्थायी सभापती, उपमहापौर व इतर समित्यांचे पदांचे समान वाटप करावे, अशा अटीही घातल्या जात आहेत. त्यावर आता नेतेमंडळी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. त्यात या गटाने तटस्थ राहण्याचाही इशारा दिल्याने काँग्रेसची धाकधुक वाढली आहे.

Web Title: Congress-NCP candidature decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.