सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली असताना, दोन्ही बाजूंनी फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. सत्ताधारी भाजपमधील काही नाराज स्वगृही परतल्याने थोडा दिलासा मिळाला असला तरी, अद्याप बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी कसरत करावी लागत आहे. भाजपचे सात नगरसेवक अद्यापही संपर्काबाहेर आहेत, तर काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी सवतासुभा मांडल्याने आघाडीची धाकधूक वाढली आहे. सध्या काँग्रेस आघाडीकडे ३९, तर भाजपकडे ३६ नगरसेवक असून दोन नगरसेवकांची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याचे समजते. त्यामुळे सोमवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक चुरशीची होत आहे. महापालिकेत भाजपचे बहुमत असून ४३ संख्याबळ होते. पण गेल्या अडीच वर्षात भाजपमधील नगरसेवकांत असंतोष निर्माण झाला होता. त्याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला आहे. राज्यातील सत्तेचा पुरेपूर फायदा घेत राष्ट्रवादीने भाजपच्या १२ नगरसेवकांना गळाला लावले होते. उमेदवारी अर्ज दाखल होताच हे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले. त्यातील तिघांना रोखण्यात यश आले, तर आणखी दोघेजण स्वगृही परतले आहेत. अजूनही सात नगरसेवक गायब आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ३६ वर आले आहे.
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीत महापौर पदाच्या उमेदवारीचा फैसला झालेला नाही. नेत्यांत काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी महापौर पदासाठी दबावगट तयार केला आहे. हे नगरसेवक स्वतंत्ररित्या सहलीवर गेले आहेत. महापौरपद काँग्रेसलाच मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. या नगरसेवकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. त्याला अजून यश आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही गॅसवर आहेत. सध्या आघाडीकडे ३९ नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी सत्तेची सुई आघाडीकडे झुकल्याचे चित्र असले तरी, भाजपनेही जोर लावला आहे. त्यासाठी सोमवारचा दिवस महत्त्वाचा आहे.
चौकट
दोघांची भूमिका अस्पष्ट
भाजपचे नऊ नगरसेवक फुटले होते. त्यापैकी दोघेजण स्वगृही परतले आहेत. अजूनही सात नगरसेवक संपर्काबाहेर आहेत. त्यातील पाचजण आघाडीसोबत राहतील, असा दावा केला जात आहे, तर उर्वरित दोन नगरसेवकांची भूमिका अस्पष्ट आहे. ते मतदान करणार की तटस्थ राहणार, यावर सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे.
चौकट
पक्षीय बलाबल...
भाजप व सहयोगी : ४३
काँग्रेस : १९
राष्ट्रवादी : १५