सांगलीत कॉंग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत झटापट, लाठीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 04:27 PM2020-03-05T16:27:04+5:302020-03-05T16:27:54+5:30
या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गॅसची एक मोठी प्रतिमा तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. दुस-या बाजुस कॉंग्रेसच्या नेत्यांसह गॅसदरवाढीचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता.
सांगली : गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पोलिसांनी धक्काबुक्की करून लााठीमारही केला. जवळपास १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे महासचिव हरपाल सिंग, महाराष्टÑाचे सहप्रभारी गौरव सिमाले युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव जयदीप शिंदे आणि सांगलीचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या कॉंग्रेस भवनासमोर गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गॅसची एक मोठी प्रतिमा तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. दुस-या बाजुस कॉंग्रेसच्या नेत्यांसह गॅसदरवाढीचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास मज्जाव केला. तरीही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आंदोलनास सुरुवात केली. जवळपास तिनशे ते चारशे युवक कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने आंदोलनाची तीव्रता अधिक वाटत होती. पोलिसांनी त्यामुळे आंदोलन न करण्याची सूचना केली.
कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. इतक्यात पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरून कॉंग्रेस भवनाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. आंदोलनात इंद्रजित साळुंखे, संदीप जाधव, जयदीप भोसले, संभाजी पाटील, राजू वलांडकर, सुरेश बलबंड, सुधीर लकडे, प्रमोद जाधव, सौरभ पाटील, उदय थोरात आदी सहभागी झाले होते.
पोलिसांची भूमिका अनाकलनीय
आंदोलनाची आम्ही रितसर परवानगी काढली होती. शांततेने व लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अशाप्रकारे धक्काबुक्की व लाठीमार करणे अयोग्य आहे. आंदोलन दडपण्याचे नियोजन पोलिसांनी अगोदरपासून केले होते, अशी टीका जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले.